नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, उच्च शिक्षणाच्या निमित्ताने किंवा इतरही काही कारणांस्तव दुसऱ्या शहरामध्ये स्थानांतरीत होण्याचा प्रसंग कित्येकदा येत असतो. हे स्थानांतरण थोडेच दिवसांकरिता असेल तर तितकीशी अडचण उद्भवत नाही. पण हा कालावधी जर काही वर्षांचा असेल आणि आपला परिवारही आपल्या सोबत येणार असेल, तर मात्र काही गोष्टी विचारात घेऊन पूर्वनियोजन केल्यास ही transition अगदी सोपी होऊन जाते.
दुसऱ्या शहरमध्ये स्थानांतरण करताना ..
ज्या ठिकाणी आपली बदली होणार आहे त्या ठिकाणची सर्व माहिती इंटरनेट च्या मदतीने मिळविणे आता सहज शक्य झाले आहे. त्यामुळे जिथे बदली होणार आहे त्या शहराबद्दल जाणून घेऊन, तिथल्या कुठल्या भागामध्ये घर घेऊन राहणे आपल्याला जास्त सोयीचे असणार आहे याचा विचार करावा. नवीन शहरामध्ये आपल्या परिचयाचे लोक असल्यास त्यांचाही सल्ला या बाबतीत उपयोगी पडू शकेल. घर घेताना आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण होतील असे पाहावे, म्हणजेच मुले असल्यास त्यांच्यासाठी शाळा किंवा कॉलेज, कोचिंग क्लासेस, दैनंदिन गरजा पूर्ण होऊ शकण्या इतपत वस्तू मिळतील अशी मार्केट्स, रुग्णालये इत्यादी गोष्टी, आपण राहणार असलेल्या घराच्या जवळपास असतील असे बघावे. आजकाल काही ठिकाणी, काम करत असलेलेया कंपनी द्वारेच राहण्याची सोय केलेली असल्यास घर शोधण्याचा त्रास वाचतो. घर घेताना आपले बजेट बघून फर्निश्ड किंवा सेमी – फर्निश्ड घ्यायचे हा ही विचार करावा. त्यामुळे आपले सगळे सामान बरोबर न्यायचे की आवश्यक तेवढेच न्यायचे याचाही विचार करावा. सगळे सामान बरोबर नेणार नसल्यास, मागे ठेवत असलेल्या सामानाची योग्य व्यवस्था करावी. packers – movers ची सोय आता सगळीकडे सहज मिळणे शक्य असल्याने सामानाची बांधाबांध, शिफ्टिंग आणि ऑफलोडिंग या गोष्टी विना त्रास पार पाडता येतात.
आपली बदली होणार असल्याची कल्पना आपल्याला दोन – तीन महिने आधीपासूनच असली तर त्या वेळेपासूनच थोडे थोडे पैसे वेगळे ठेवण्यास सुरुवात करावी. त्यामुळे बदलीच्या वेळेला येणारे लहान – मोठे खर्च {उदा. ट्रान्स्पोर्ट कंपनीचे चार्जेस, मुलांच्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या प्रवेशाचा खर्च, नवीन घरासाठी द्यावे लागणारी आगाऊ रक्कम ( deposit )} हाताळणे सोपे होईल. जर नोकरी नवी असेल तर त्याच्या माध्यमातून उत्पन्न सुरू होई पर्यंत सुद्धा ही साठवलेली पुंजी कामी येऊ शकते. त्याचबरोबर आपण ज्या शहरामध्ये स्थायिक होणार असू, तेथील राहणीमान कसे असेल याचा अंदाज घेऊन त्या मानाने पैसे हाताशी ठेवणे उत्तम.
बदलीच्या ठिकाणी जायला निघण्यापूर्वी उर्वरित बिले चुकती करावीत. त्याचबरोबर gas connection ट्रान्स्फर करूण घेणे, बँक खाती ट्रान्स्फर करून घेणे इत्यादी कामे वेळेत उरकावी. मुलांच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ट्रान्स्फर certificate आणि पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज वेळेवर करावा.
आपले सामान ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या मार्फत पाठवताना सगळ्या सामानाची व्यवस्थित यादी करावी, तसेच सामनाचा विमा उतरावा. त्यामुळे, दुर्दैवाने अपघातामुळे किंवा इतर काही कारणांमुळे सामानाचे नुकसान झाल्यास त्याची योग्य भरपाई होऊ शकते. सामानाची बांधाबांध करताना मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्रे ( passports, बँक व्यवहारांची कागदपत्रे, रेशन कार्ड इत्यादी ) व्यवस्थित ठेऊन, स्वतःबरोबरच न्यावीत. आपली चारचाकी किंवा दुचाकी वाहने सामनाबरोबरच पाठवायची असल्यास त्याची पूर्वकल्पना ट्रान्सपोर्ट कंपनीस द्यावी. नव्या शहरामध्ये पोहोचण्या आधी, घर ताब्यात मिळेपर्यंत इतरत्र राहण्याची पर्यायी व्यवस्था आधीच करून ठेवावी.
नवीन शहरामध्ये स्थानांतरित होताना ह्या सगळ्या गोष्टींचे नियोजन आधीपासूनच केले गेले तर ऐनवेळी गोंधळ होत नाही. एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये स्थायिक होण्याची ही प्रक्रिया थोडीशी कठीण जरी वाटत असली तरी योग्य नियोजनामुळे हा बदल सोपा होऊन जातो.