नवी दिल्ली – ट्विटर डील एलन मस्क यांच्या अंगलट येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या डीलबाबत रोज नवनवीन वाद निर्माण होत आहेत. आता ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी एलन मस्क यांच्या विरोधात खटला दाखला आहे. भागधारकांचा आरोप आहे की मस्क यांच्यामुळे शेअरची किंमत सतत घसरत आहे.
शेअरहोल्डर्सनी एलन मस्क विरोधात दाखल केला खटला, शेअरच्या किमती कमी झाल्यामुळे संतापले
मस्क यांच्यावर $44 अब्ज डॉलरच्या करारातून मुक्त होण्यासाठी आणि ट्विटरवर नवीन किंमत लादण्यासाठी जाणूनबुजून शेअरच्या किमती कमी केल्याचा आरोप आहे. एलन मस्क यांच्यावरही या कराराबाबत अनेक संशयास्पद विधाने केल्याचा आरोप आहे. मस्क यांच्या डीलच्या विधानामुळे भागधारकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी एका भागधारकाने सॅन फ्रान्सिस्कोमधील फेडरल कोर्टात अपील केले आहे.
मस्क यांच्या एका विधानाने उडाली खळबळ
एलन मस्क यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते, की जोपर्यंत त्यांना प्लॅटफॉर्मवर स्पॅम खात्यांच्या संख्येचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत ट्विटर विकत घेण्याची त्यांची बोली पुढे जाणार नाही. एलन मस्क यांनीही त्यांच्या अनेक ट्विटमध्ये दावा केला आहे की, अनेक खाती बॉट्सद्वारे व्यवस्थापित केली जातात. मस्क यांच्या वक्तव्यानंतर शेअर्सच्या किमती घसरत आहेत.
जॅक डोर्सी यांनी दिला ट्विटर बोर्डाचा राजीनामा
ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनीही ट्विटर बोर्डाचा राजीनामा दिला आहे. जॅक डोर्सी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीईओ पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर भारताचे पराग अग्रवाल यांना नवीन सीईओ बनवण्यात आले होते. या राजीनाम्यानंतर जॅक डोर्सी यांचे ट्विटरसोबतचे नाते पूर्णपणे संपुष्टात आले आहे. गेल्या वर्षी सीईओ पदावरून पायउतार झाल्यानंतर, कंपनीने जॅक डोर्सी यांचा कार्यकाळ संपेपर्यंत बोर्डावर राहण्याची आणि 2022 च्या स्टॉकहोल्डर्सच्या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा केली होती.