मुंबई – महाराष्ट्रातील अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदारांच्या तक्रारी लक्षात घेऊन संसदीय समितीने राज्याच्या अधिकाऱ्यांना 15 जून रोजी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांनाही दिल्लीत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही दिल्लीत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
पुन्हा एकदा तापला नवनीत राणाच्या अटकेचा मुद्दा, संसदीय समितीने नोटीस पाठवून मुंबई पोलीस आयुक्तांना आणि डीजीपींना दिल्लीला बोलावले
15 जून रोजी दुपारी 12.30 वाजता दिल्लीत नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारींवर सुनावणी होणार आहे. नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, पोलीस लॉकअपमध्ये आपल्याला योग्य वागणूक दिली जात नव्हती. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सांगितले होते की, त्यांना पाणीही दिले जात नव्हते. त्या दलित असल्याबद्दल जातीवाचक गोष्टी बोलल्या जात होत्या. वॉशरूममध्ये जाण्यासही परवानगी नव्हती.
दरम्यान नवनीत राणाचा हा आरोप खोटा ठरवण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा पोलिस स्टेशनमध्ये चहा पिताना दाखवण्यात आले होते. मात्र नंतर राणा दाम्पत्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय पांडे यांनी खार पोलिस स्टेशनचा व्हिडिओ जारी केला आहे. तर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्याच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले.
तुरुंगातून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार नवनीत राणा यांना पाठदुखीमुळे लीलावती रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पाठदुखी असल्याचे माहीत असूनही तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना जमिनीवर झोपण्यास भाग पाडले, असा आरोप राणा दाम्पत्याने केला. त्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढल्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. वारंवार आवाहन करूनही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी केला.