लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या अपघातात सात जवान शहीद, 19 गंभीर जखमी


नवी दिल्ली: लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात लष्कराचे सात जवान शहीद झाले, तर 19 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, परतापूर येथून 26 लष्करी जवानांना घेऊन जाणारे वाहन घसरले आणि 50-60 फूट खाली श्योक नदीत पडले, त्यात सात जवानांचा मृत्यू झाला आणि 19 जवान गंभीर जखमी झाले. लष्कराचे वाहन नदीत कशामुळे पडले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

या अपघाताबाबत लष्कराकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, सैनिकांची बस संक्रमण शिबिरातून सब सेक्टर हनिफच्या फॉरवर्ड लोकेशनच्या दिशेने जात होती.

थॉईसपासून सुमारे 25 किमी अंतरावर हा अपघात झाला, जिथे लष्कराची बस सुमारे 50-60 फूट खोलवर श्योक नदीत पडली. यामध्ये लष्कराचे सर्व जवान जखमी झाले. सर्व जवानांना परतापूर येथील 403 फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि लेहमधील सर्जिकल टीम परतापूरला पाठवण्यात आली. रुग्णालयात सात जवानांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी सैनिकांनाही एअरलिफ्ट करून वेस्टर्न कमांडकडे पाठवले जाऊ शकते.