पुढील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात हार्दिक पटेल, दिले निवडणूक लढवण्याचे संकेत


अहमदाबाद – पाटीदार आंदोलन समितीचे (PAAS) निमंत्रक आणि काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष हार्दिक पटेल 30 मे किंवा 31 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. असे संकेत त्यांनी शुक्रवारी दिले असून निवडणूक लढविण्याचेही संकेत दिले आहेत. पटेल यांनी एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करत असून विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवायची याचा निर्णय पक्ष घेईल, असे संकेत दिले आहेत. त्याचवेळी, हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश केल्यावर एक भव्य कार्यक्रमही होणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

पक्षात सहभागी होण्यासाठी उपलब्ध आहेत दोन पर्याय
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल यांना भाजपमध्ये येण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले होते. दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत किंवा गांधीनगरमध्ये गुजरात भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि बीएल संतोष यांच्या उपस्थितीत पटेल यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले. मात्र, पटेल यांनी दुसरा पर्याय निवडला, तो म्हणजे गांधीनगर. सूत्रांनी सांगितले की, हार्दिक आणि भाजप या दिवशी मोठ्या मेळाव्याला संबोधित करण्याची योजना आखत आहेत. सोमनाथ मंदिर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी एकता यात्रेचे नेतृत्व करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

18 मे रोजी काँग्रेसमधून राजीनामा
हार्दिकने 18 मे रोजीच काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एका दिवसानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी शुक्रवारी आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते.

राजीनामा दिल्यापासून काँग्रेसवर हल्लाबोल
ज्या दिवसापासून हार्दिक यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे, त्या दिवसापासून ते पक्षावर सतत हल्लाबोल करताना दिसत आहेत. पटेल यांनी काँग्रेसचे पाटीदार आणि गुजरातविरोधी असे वर्णनही केले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची कृतीही गुजरातविरोधी असल्याचे ते म्हणाले. हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसचे प्रभारी रघु शर्मा आणि जीपीसीसीचे माजी अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांच्यावर विशेषतः निशाणा साधत आहेत. ते म्हणाले की, हे नेते जनतेच्या भावनांचा आदर करत नाहीत.