नवी दिल्ली – नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणी लवकरच वाढू शकतात. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याला आज समन्स बजावले आहे. अब्दुल्ला यांना 31 मे रोजी दिल्ली मुख्यालयात तपासकर्त्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अब्दुल्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे समन्स, 31 मे रोजी हजर राहण्याचे आदेश
JKCA मधील आर्थिक अनियमिततेचे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, ही चौकशी जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मधील कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाशी संबंधित आहे, ज्याची ईडीकडून चौकशी केली जात आहे. फारुख यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत 31 मे रोजी येथील मुख्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
जप्त करण्यात आली 11.86 कोटींची मालमत्ता
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 2020 मध्ये या प्रकरणात अब्दुल्ला यांची 11.86 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी 84 वर्षीय एनसी नेत्याची ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. ईडीने आरोप केला होता की अब्दुल्ला यांनी भूतकाळात जेकेसीएचे अध्यक्ष म्हणून आपल्या पदाचा “दुरुपयोग” केला आणि बीसीसीआय प्रायोजित निधीचा गैरवापर करता यावा म्हणून क्रीडा संस्थेत नियुक्त्या केल्या.