छत्रपती संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून बाहेर, केली निवडणूक न लढण्याची घोषणा, शिवसेनेवर केला फसवणुकीचा आरोप


मुंबई : आगामी राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याची औपचारिक घोषणा आज छत्रपती संभाजी राजे यांनी केली. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा मिळत नव्हता. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेनेने आपली फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना राज्यसभेसाठी शिवसेनेचा पाठिंबा हवा होता. मात्र शिवसेनेने त्यांच्यापुढे पक्षात येण्याची अट ठेवली होती. तर संभाजी राजे यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची होती. या विषयावर एकमत न झाल्यामुळे शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला.

शिवसेनेचे दोन नेते संजय राऊत आणि संजय पवार यांनीही गुरुवारी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संभाजी राजेंना पाठिंबा दिला असला, तरी त्यांच्याकडे केवळ एका आमदाराचे संख्याबळ आहे.

मी कोणत्याही पक्षाचा द्वेष करत नाही
छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, माझा कोणत्याही राजकीय पक्षाविषयी द्वेष नाही. मला ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवायची होती. मात्र पाठिंब्याअभावी हे शक्य होत नाही. ते म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्षाचा स्वतःचा अजेंडा असतो. ज्याच्याबरोबर जाणे मला शक्य नाही. माझ्यासाठी निवडणुकीपेक्षा जनता महत्त्वाची आहे. ते म्हणाले की, आता मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील 42 आमदार ही माझी ताकद नाही, असेही ते म्हणाले. त्यापेक्षा राज्यातील जनता ही माझी ताकद आहे.

मला माझी ताकद बघायची आहे
मला आता माझी ताकद बघायची आहे, असे सांगून संभाजी राजे म्हणाले की, राज्यसभेसाठी 42 आमदारांचा पाठिंबा ही माझी ताकद नसून, राज्यातील जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे. ते म्हणाले की, आता मी माझी संघटना वाढवून मजबूत करेन. तसेच मी उद्यापासूनच माझा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे.