तिहारच्या सात क्रमांकाच्या तुरुंगात यासिन मलिक भोगणार जन्मठेपेची शिक्षा, मिळणार नाही, पॅरोल आणि फर्लोही


नवी दिल्ली : दहशतवादी फंडिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाने बुधवारी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर मलिकची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. शिक्षेपूर्वीच मलिकवर तिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी तिहार प्रशासनाकडून यासीन मलिकला कडेकोट बंदोबस्तात इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मलिक यांना सुरक्षेच्या दृष्टीने तुरुंगात कोणतेही काम देण्यात आलेले नाही. त्याला 7 क्रमांकाच्या कारागृहात ठेवण्यात आले असून वेळोवेळी त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. अधिकाऱ्याने असेही सांगितले की मलिक दहशतवादी निधीसाठी दोषी असल्याने त्याला कोणत्याही पॅरोल किंवा फर्लोचा हक्क मिळणार नाही.

यासीनने दिली आहे गुन्ह्याची कबुली
बुधवारी एका न्यायालयाने काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मलिकला फाशीची शिक्षा देण्याची राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) मागणी न्यायालयाने फेटाळली.

पटियाला हाऊस येथील विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी खचाखच भरलेल्या न्यायालयात संध्याकाळी 6 नंतर दिलेल्या निकालात यासिनला दोन कलमांत जन्मठेपेची, एका कलमात 10 वर्षे आणि एका कलमात पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्याला दंडही ठोठावला. न्यायालयाच्या निर्णयानुसार, सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, दोषीने स्वत: त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याचे कोणतेही कारण नाही.