चिनी व्हिसा घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात पोहोचले कार्ती चिदंबरम, म्हणाले- काही चूक केली नाही


नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. चिनी व्हिसा घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ते आज सीबीआय मुख्यालयात पोहोचले असून तेथे त्यांना अनेक गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मात्र, सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी एकाही चिनी नागरिकाला व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केलेली नाही. याआधी ते INX मीडिया प्रकरणात तुरुंगात गेले आहेत.

बुधवारीही ईडीने दाखल केला गुन्हा
2011 मध्ये 263 चिनी नागरिकांना व्हिसा बनवण्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी यापूर्वी कार्ती आणि त्यांचे वडील माजी अर्थ आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानावर सीबीआयने छापे टाकले होते.

हे प्रकरण आहे
2011 मध्ये कार्तीचे वडील पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना पंजाबमध्ये कार्यरत असलेल्या चिनी कंपनीच्या लोकांना कथितरित्या बेकायदेशीरपणे व्हिसा देण्यात आल्याचा आरोप आहे. कार्तीचा जवळचा सहकारी भास्कर रमण याच्यामार्फत या प्रकरणात लाचेची रक्कम घेऊन गैरव्यवहार करण्यात आला होता. चिनी कंपनीच्या लोकांनी रमणच्या माध्यमातून कार्तीशी संपर्क साधला होता. या प्रकरणी सीबीआयने रमण यांना अटक केली आहे. सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत. कार्ती चिदंबरम यांनाही सीबीआयसमोर हजर व्हायचे होते, मात्र ते हजर झाले नाहीत.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काय म्हटले आहे?
व्हिसा घोटाळा प्रकरण वेदांत समूह कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (TSPL) च्या उच्च अधिकाऱ्याने कार्ती आणि त्याचा जवळचा सहकारी एस भास्कर रमण यांना लाच दिल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. ही कंपनी पंजाबमध्ये वीज प्रकल्प उभारत होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्प उभारण्याचे काम एका चिनी कंपनीकडून करण्यात येत असून हे काम वेळेच्या मागे सुरू होते.