मुंबई – संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. एकीकडे शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून उतरवण्याची घोषणा केलेली असताना दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या विचारातून मागे हटलेले दिसत नाहीत. दरम्यान, शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांच्या रूपाने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे संभाजीराजे छत्रपतींचे आहे का लक्ष?
‘यापुढे राज्यसभा नाही, तर संपूर्ण राज्य ताब्यात घेणार’
सत्ताधारी महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर न केल्यामुळे संभाजीराजे छत्रपतींची कोंडी झाली आहे. त्यांना उमेदवारी नाकारल्याने मराठा संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. संभाजीराजे छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे एक पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये ‘यापुढे राज्यसभा नाही, तर संपूर्ण राज्य ताब्यात घेणार’ असे लिहिले आहे. पोस्टरमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्य निर्मितीचा उल्लेख करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनीही 2024च्या विधानसभा निवडणुका लक्ष्यावर असल्याचे संकेत दिले.
संभाजीराजे छत्रपतींच्या या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणखी अडचणीत आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील विद्यमान सरकारसाठी 2024 चा रस्ता आता आणखी कठीण होत असल्याचे दिसत आहे.