Hindustan Motors: अॅम्बेसेडर बनवणारी हिंदुस्थान मोटर्स करणार पुनरागमन, लॉन्च करणार इलेक्ट्रिक स्कूटर, कार


नवी दिल्ली – आयकॉनिक अॅम्बेसेडर कार देशातील सर्वात लोकप्रिय कारांपैकी एक आहे. मात्र, आता या कारची विक्री थांबली आहे. अहवालानुसार, Ambassador कार बनवणारी प्रसिद्ध कंपनी, हिंदुस्थान मोटर्स (Hindustan Motors) इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा विचार करत आहे.

भारतीय वाहन उद्योगात झपाट्याने बदल होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांबद्दल लोकांची आवड सातत्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. बदलत्या वातावरणात ऑटोमेकर्स त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांची नवीन मॉडेल्स सादर करत आहेत.

हिंदुस्थान मोटर्स ईव्ही उद्योगातील युरोपियन ऑटोमोबाईल कंपनीशी हातमिळवणी करून आपला व्यवसाय पुनरुज्जीवित करू पाहत आहे. मात्र, कंपनीबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. पण हिंदुस्थान मोटर्सने युरोपियन ईव्ही उत्पादक कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे.

दोन्ही उत्पादक सध्या इक्विटी रचनेवर चर्चा करत आहेत. सध्याच्या प्रस्तावित फ्रेमवर्कमध्ये हिंदुस्थान मोटर्सकडे 51 टक्के आणि युरोपियन ब्रँडचा उर्वरित 49 टक्के हिस्सा असेल.

केवळ इलेक्ट्रिक कारच नाही तर इलेक्ट्रिक टू-व्हीलरही या संयुक्त उपक्रमातून बनवण्यात येणार आहेत. वास्तविक, कंपनीचे पहिले उत्पादन इलेक्ट्रिक स्कूटर असेल. इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाइकला खरेदीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट सर्वकालीन उच्चांकावर आहे आणि त्यात सतत वाढत आहे.

पश्चिम बंगालमधील हिंदुस्थान मोटर्सच्या उत्तरपारा प्लांटमध्ये सुरुवातीला इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाईल. हा प्लांट 2014 पर्यंत कार्यरत होता. कंपनी उत्तरपारा परिसरातील 295 एकर जमीन वापरणार आहे. संयुक्त उपक्रम सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबाबतची अधिक माहिती येत्या काळात समोर येईल.