खासदार नवनीत राणांना जिवे मारण्याच्या धमक्या, दिल्ली पोलिसांनी दाखल केली तक्रार


नवी दिल्ली – महाराष्ट्रातील अपक्ष लोकसभा सदस्य नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून राणा यांनी दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी संध्याकाळी 5.27 ते 5.47 या दरम्यान त्यांना 11 वेळा कॉल करण्यात आला.

हनुमान चालिसा वादानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या खासदार राणा यांनी बुधवारी पोलिसांना फोनवरून धमकी आल्याचे सांगितले. मुंबईतील शिवसेना मुख्यालय ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या आवाहनाप्रकरणी राणा यांना नुकतीच अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.

अपमानास्पद भाषेत बोलले, वापरले अपशब्द
राणांच्या स्वीय सहाय्यकाने दिल्ली पोलिसांकडे फोनवरून दिलेल्या धमक्यांची तक्रार केली आहे. मंगळवारी सायंकाळी राणांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर हे फोन कॉल्स करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. राणांच्या म्हणण्यानुसार, कॉलरने त्यांच्याशी बोलताना अपशब्द वापरले, शिवीगाळ केली आणि महाराष्ट्रात परत गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

हनुमान चालिसा वाचाल तर मारले जाल
तू पुन्हा हनुमान चालिसा वाचलीस तर तुला मारून टाकू, अशी धमकीही राणांना दिली होती. याप्रकरणी दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या धमकीनंतर राणा या घाबरल्या असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खासदारांची तक्रार प्राप्त झाली असून, कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.