नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरलेला जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक यांच्याबाबत एक वादग्रस्त आणि चिथावणीखोर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने यासिन मलिकचे समर्थन केले. यावर भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राने आफ्रिदीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
यासिन मलिकच्या समर्थनात शाहिद आफ्रिदीचे ट्विट, अमित मिश्राचे चोख प्रत्युत्तर
दिल्लीतील विशेष न्यायालय आज यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावणार आहे. यावर आफ्रिदीने ट्विटमध्ये लिहिले, काश्मीरमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना भारत ज्या प्रकारे गप्प करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचे कोणतेही समर्थन नाही. यासीन मलिकवरील आरोपांमुळे काश्मीरचा स्वातंत्र्यलढा थांबणार नाही. मी UN ला आवाहन करतो की, काश्मीरच्या नेत्यांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर मार्गांची दखल घ्यावी.
यानंतर मिश्राने आपल्या उत्तराने आफ्रिदीचे तोंड बंद केले. अमित मिश्राने लिहिले- प्रिय शाहिद आफ्रिदी! यासीन मलिकने कोर्टात गुन्हा कबूल केला आहे. आपल्या जन्मतारीखाइतकी प्रत्येक गोष्ट दिशाभूल करणारी असू शकत नाही. अमित मिश्रा याचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आफ्रिदीने यापूर्वी अनेकदा काश्मीर मुद्द्यावर प्रक्षोभक विधाने केली आहेत आणि अनेकदा ट्विटही केले आहेत.