जपानहून परतताच कामात व्यस्त झाले पंतप्रधान मोदी, दिल्लीत येताच बोलावली मंत्रिमंडळाची बैठक


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावरून परतले असून आज सकाळीच ते दिल्लीला पोहोचले आहेत, पण विशेष म्हणजे भारतात परतताच ते आपल्या कामात व्यस्त झाले आहेत. पंतप्रधानांनी सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान मोदी सर्व मंत्र्यांसोबत कॅबिनेटची बैठक घेत आहेत. यावेळी सर्व मंत्री उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जपान दौऱ्यात जवळपास 24 सभा घेतल्या. मंगळवारीही मोदींनी 11 तासांत जवळपास 12 कार्यक्रमांना हजेरी लावली. या प्रवासात ते फक्त सात तास झोपले. 22 मे रोजी रात्री आठ वाजता ते जपानला रवाना झाले. पंतप्रधानांनी विमानात अधिकाऱ्यांसोबत दीड तास बैठक घेतली. 23 मे रोजी सकाळी 7.30 वाजता ते टोकियोला पोहोचले. 40 मिनिटांनी म्हणजे सकाळी 8.30 वाजल्यापासून नऊ कार्यक्रमात सामील झाले. 23 मे रोजी पंतप्रधानांनी एकूण 12 तास बैठक आणि इतर कार्यक्रमांना हजेरी लावली.