प्रज्ञानानंदचा उपांत्य फेरीत प्रवेश, चीनच्या वेई यीचा केला पराभव


नवी दिल्ली : भारताचा युवा ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानानंदने चेसबल मास्टर्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याने मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर चेसबल मास्टर्समध्ये चीनच्या वेई यीचा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. आता त्याचा सामना नेदरलँडच्या अनिश गिरीशी होणार आहे. याच स्पर्धेच्या पाचव्या फेरीत 16 वर्षीय प्रज्ञानानंदने जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करून चर्चेत आला. विश्वविजेत्याला पराभूत करण्याची ही दुसरी वेळ होती. 90 दिवस आधी, फेब्रुवारी महिन्यात त्याने एअरथिंग्स मास्टर्समध्ये कार्लसनचा प्रथमच पराभव केला होता.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी, प्रज्ञानानंदने उपांत्यपूर्व फेरीत वेई विरुद्ध 2.5–1.5 असा विजय मिळवला. त्याचवेळी कार्लसनने स्पेनच्या डेव्हिड अँतानो गुझारोचा 2.5-0.5 ने पराभव केला, तर अनिश गिरीने नॉर्वेच्या आर्यन टोरीचा 2.5-0.5 ने पराभव केला. उपांत्य फेरीत कार्लसनचा सामना लिरेनशी होईल, ज्याने उपांत्य फेरी गाठण्यासाठी अझरबैजानच्या शाखरियार मामेदयारोवचा 2.5-1.5 असा पराभव केला.

शानदार सुरुवातीनंतर विजयावर शिक्कामोर्तब
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात, प्रज्ञानानंदने वेई यी विरुद्ध चांगली सुरुवात केली आणि काळ्या तुकड्यांसह पहिला गेम 90 चालींमध्ये जिंकला. त्याने दुसऱ्या गेममध्येही आघाडी कायम ठेवली आणि चार गेमच्या सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या गेममध्ये चीनने जोरदार पुनरागमन करत प्रज्ञानानंदची आघाडी कमी केली. यानंतर सामन्यातील चौथा गेम अनिर्णित राहिला आणि प्रज्ञानानंदने 2.5-1.5 अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह त्याने उपांत्य फेरीत धडक मारली. तो अनिस, कार्लसन आणि डिंग लिरेन यांच्या मागोमाग चौथ्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत प्रज्ञानंद व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. पी हरिकृष्णा आणि गुजराथी 16 खेळाडूंच्या स्पर्धेत पहिल्या आठमध्ये स्थान मिळवू शकले नाहीत आणि बाद फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरले.

वयाच्या 12व्या वर्षी झाला ग्रँडमास्टर
प्रज्ञानानंद यांनी वयाच्या 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवसांत ग्रँड मास्टरची पदवी संपादन केली. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. त्याच वेळी, 2018 मध्ये, तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. त्याच्या आधी केवळ युक्रेनचा सर्गेई करजाकिन हा 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.