नवी दिल्ली – आशिया चषक 2022 या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे, परंतु आतापर्यंत या स्पर्धेच्या यजमानपदावर साशंकता आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने यापूर्वी श्रीलंकेला यजमानपद दिले होते, परंतु सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकट आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक दुसऱ्या देशात आयोजित करण्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेतील आर्थिक संकट पाहता आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान आधीच या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशला आशिया कप 2022 चे यजमानपद मिळू शकते.
Asia Cup 2022 : श्रीलंकेच्या जागी बांगलादेश मिळू शकते आशिया चषकाचे यजमानपद
आशिया चषक 27 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल आणि स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. त्याचवेळी, श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी आपल्या देशातील जनतेला सांगितले की, येणारे दोन महिने त्यांच्यासाठी सर्वात कठीण जाणार आहेत. तेथे खाद्यपदार्थांचा पुरवठा होत नाही आणि प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत.
भारत आणि पाकिस्तान होऊ शकत नाहीत यजमान
भारत आणि पाकिस्तान हे आशिया चषक स्पर्धेतील दोन मोठे संघ आहेत, परंतु या दोन देशांमधील राजकीय तणाव दीर्घकाळापासून सुरू आहे आणि संबंध खूपच खराब आहेत. या कारणास्तव हे दोन्ही देश एकमेकांशी खेळू शकत नाहीत आणि दोघेही आशिया कपचे यजमानपद राखू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बांगलादेश व्यतिरिक्त यूएई आणि ओमान हे दोन पर्याय या स्पर्धेच्या यजमानपदासाठी आहेत. या दोन देशांमध्ये उन्हाळ्यात तापमान खूप जास्त असते. यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेला येथेही आशिया चषक आयोजित करणे पसंत नाही. अशा परिस्थितीत बांगलादेश हा आशिया चषकाचे यजमानपदासाठी सर्वात योग्य पर्याय आहे.
पाकिस्तान श्रीलंकेत खेळणार नाही एकदिवसीय मालिका
पाकिस्तान येत्या काळात श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होता, मात्र दोन्ही देशांमधील चर्चेनंतर ही मालिका रद्द करण्यात आली आहे. मात्र, जुलै-ऑगस्टमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ तेथील परिस्थितीवरही लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेत तीन टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिका जून आणि जुलै महिन्यात खेळल्या जातील.