नवी दिल्ली – आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांसाठी गव्हर्निंग कौन्सिलने नवीन नियमांची माहिती दिली आहे. क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि सामना नियमित वेळेत पूर्ण झाला नाही, तर सुपर ओव्हर होईल. त्याचबरोबर अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल.
क्वालिफायर-1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 मध्ये एकही षटक झाले नसेल तर, पॉईंट टेबलच्या आधारे विजेता ठरवला जाईल. गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाईल. या तीन सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. त्यामुळे 30 मे हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.
आयपीएलचे प्लेऑफ सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. क्वालिफायर-1 24 मे रोजी कोलकात्यात आणि 25 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. तेथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना न झाल्यास क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्स आणि एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सला फायदा होऊ शकतो.
24 मे रोजी पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ 25 मे रोजी एलिमिनेटरमध्ये आमनेसामने असतील. गुणतालिकेत गुजरात पहिल्या तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आणि आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरा क्वालिफायर (27 मे) आणि अंतिम (29 मे) अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.
आयपीएलनुसार, प्लेऑफ सामन्यात आवश्यक असल्यास सामन्यातील षटकांची संख्या कमीत कमी पाच षटकांपर्यंत कमी केली जाऊ शकते. या पाच षटकांत खेळ पूर्ण झाला नाही, तर सुपर ओव्हर होईल. तिथेही निकाल लागला नाही, तर गुणतालिकेत जो संघ अधिक चांगला असेल त्याला विजेता घोषित केले जाईल.