बिहारमध्ये भीषण अपघात, 16 जणांना जम्मू-काश्मीरला घेऊन जाणारा ट्रक उलटला, आठ जणांचा जागीच मृत्यू


पाटणा – बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे 16 मजुरांना जम्मू-काश्मीरला घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रक सिलीगुडीहून जम्मू-काश्मीरला जात होता, असे सांगण्यात येत आहे. पूर्णियाच्या जलालगडमध्ये ट्रक नियंत्रणाबाहेर गेला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले.

लोखंडी पाईपखाली गाडले गेले कामगार
घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढण्यात येत असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रकमध्ये बोरिंग साहित्य भरलेले होते. त्यात लोखंडी पाईप होते. ट्रक अनियंत्रित झाला अणि पलटी झाल्यामुळे मजूर या पाईपखाली दबले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.

वेगात होता ट्रक
त्याचवेळी स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ट्रकचा वेग खूप होता. ट्रक चालकाला पहाटेच्या सुमारास झोप लागली असावी, त्यामुळे ट्रकवरील नियंत्रण जाऊन तो अपघाताचा बळी ठरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळाचे फोटो खूप वेदनादायक आहेत. सर्व मजूर राजस्थानमधील उदयपूर येथील खैरवारा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.