नवी दिल्ली: मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये बेकायदेशीर अटक आणि परिणामी अमानुष वागणूक या आरोपांप्रकरणी महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा सोमवारी लोकसभेच्या संसदीय विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार आहेत. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. अपक्ष खासदार असलेल्या राणा यांनी आधीच सांगितले होते की, त्या या घटनेची माहिती देण्यासाठी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर राहतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहेत.
Hanuman Chalisa Row: आज संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार नवनीत राणा, मांडणार आहेत आपली बाजू
लोकसभा अध्यक्ष खासदारांचे संरक्षक: नवनीत राणा
नवनीत राणा म्हणाल्या की, लोकसभा अध्यक्ष हे खासदारांचे पालक असतात. आमच्या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींवर कारवाई करावी, असे आवाहन मी त्यांना केले आहे. माझ्या अटकेची संपूर्ण घटना मी त्यांना सांगितली आहे. लोकसभेच्या विशेषाधिकार समिती 23 मे रोजी माझ्या तक्रारींवर विचार करेल आणि मी समितीला लेखी निवेदनही देईन.
23 एप्रिलला अटक आणि 5 मे रोजी मिळाला जामीन
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याची धमकी दिल्याने राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर देशद्रोहासह अनेक कलमे लावली होती. त्यानंतर, राणा दाम्पत्याला 5 मे रोजी विशेष न्यायाधीश आर.एन. रोकडे यांनी काही अटींसह जामीन मंजूर केला, ज्यामध्ये या प्रकरणाविषयी सार्वजनिक आणि पत्रकारांमध्ये बोलणे टाळणे समाविष्ट होते. तत्पूर्वी, लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयामार्फत नवनीत राणा यांच्या अटकेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला होता.