“decluttering” करताना ..


आजकालच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात “घर आवरायला काढायला”सुद्धा आपल्याला सणासुदीचे किंवा घरी असलेल्या काही विशेष कार्यक्रमाचे निमित्त लागते. त्यातूनही कितीतरी वेळेला आपण वरवर आवराआवर करुन वेळ मारुन नेत असतो.आता वेळेचा अभाव म्हणा,सुट्टीच्या दिवशी बाहेरची कामे करायची असतील म्हणा,किंवा निव्वळ आळस म्हणा,या ना त्या कारणांनी आवराआवर अक्षरशः “आवरती” घेतली जाते. मग एखादा दिवस असा येतो कि त्या दिवशी अगदी आवर्जून हवी असलेली एखादी वस्तू किंवा कागदपत्र अचानक सापडेनाशी होतात. मग कपाटांतून किंवा ड्रॉवर्स मध्ये हरवलेल्या वस्तूंचा शोध घेता घेता एक गोष्ट हटकून मनात येते – “आवराआवर करायला हवी”…म्हणजेच decluttering करायला हवे. “decluttering” म्हणजे नेमके काय – तर आपल्याला गरज नसतानादेखील ज्या वस्तू आपण घरात साठवत राहतो,त्या वस्तू घरातून कमी करणे. पण हे काम एका दिवसाचे नसून,यासाठी आपल्या दैनंदिन जीवनाचा थोडा अवधी दररोज दिल्यास हे काम अतिशय सोपे होते. decluttering किंवा एकंदर आवराआवर ही घरच्या काही भागांपुरतीच मर्यादित नसून,घरातल्या प्रत्येक रूमकरता आवश्यक आहे.

१. स्वयंपाकघर : decluttering करताना स्वयंपाकघरामधील प्रत्येक कपाटांमधले आणि ड्रॉवर्स मधले सामान एक-एक करून बाहेर काढून टेबलवर किंवा ओट्यावर व्यवस्थित मांडावे. ड्रॉवर्स मधली कटलरी,डाव,पळ्या,सुऱ्या,इतर लहान उपकरणे पाहून घेऊन आपल्याला गरज नसलेल्या वस्तू बाजूला काढून ठेवाव्यात. आपल्याला हव्या असलेल्या बाकीच्या वस्तू पुन्हा ड्रॉवर्स मध्ये नीट मांडून ठेवाव्यात.नको असलेल्या वस्तू नादुरुस्त असतील,किंवा वापरता येण्याजोग्या नसतील तर टाकून द्याव्यात. जर चांगल्या वापरता येण्याजोग्या असतील तर देऊन टाकाव्यात.स्वयंपाकघराच्या कपाटांमधले ठेवलेले खाद्यपदार्थ,डाळी,पिठे वरच्यावर पहात राहावी.कित्येकदा आयते आणलेले खाद्यपदार्थ बरेच दिवस डब्यांमध्ये पडून असतात.असे जुने झालेले खाद्यपदार्थ टाकून देणे इष्ट. तयार मसाले,sauces,पेस्ट्स,स्प्रेड्स, कॅन्ड फूड इत्यादींची एक्सपायरी डेट वेळोवेळी तपासून पाहावी.एक्सपायरी डेट उलटून गेलेले मसाले,स्प्रेड्स वगैरे वापरण्याचा मोह टाळायला हवा. डाळी,पिठे किंवा इतर धान्ये आवश्यकतेनुसार आणावीत. आजकाल सगळ्या दुकानांमध्ये किंवा सुपरमार्केट्स मध्ये स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू सतत उपलब्ध असतात,त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाद्यपदार्थ “पुन्हा मिळेल कि नाही कुणास ठाऊक” असा विचार करून साठवून ठेवण्याचे टाळावे. समस्त स्त्रीवर्गाची आवडीची साठवण्याची वस्तू म्हणजे प्लास्टिकचे डबे. मग ते मिठाईचे डबे असोत,किंवा बाहेरून जेवण मागवल्यावर आलेले डबे असोत.. “पुढे वापरायला होतील” म्हणून हे डबे अगदी आवर्जून साठवले जातात.त्याच बरोबर पाण्याच्या किंवा सॉफ्टड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्यांचाही साठा असतोच.प्लास्टिकचे डबे शिजवलेले अन्न ठेवायला हवेच असतील तर उत्तम ब्रँडचे फूडग्रेड प्लास्टिकचे डबे वापरावेत. अथवा काचेची किंवा स्टील ची भांडी सगळ्यात चांगली.आपल्याला स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांशिवाय इतरही भरपूर भांड्यांचा साठा आपल्याकडे असतो. त्यातली बरीचशी भेटीदाखल मिळालेली,कधी आपल्याला आवडली म्हणून घेतलेली,पण कधीही न वापरलेली अशी भांडी असतात. अशी भांडी आपल्याला लागणार नसतील तर देऊन टाकणे चांगले. त्याचप्रमाणे डिनर सेट,टी सेट,इत्यादी वस्तू सुद्धा वापरल्या जात नसतील तर देऊन टाकणे उत्तम.

२. बेडरूम्स : बेडरूम्स मधल्या कपाटांमध्ये असलेले कपडे,कॉस्मेटिक्स,बेडशीट्स,पांघरायच्या चादरी,टेबलकव्हर इत्यादी सर्व वस्तू बाहेर काढून नीट मांडून ठेऊन,त्यातल्या फक्त आपल्याला हव्या असलेल्या आणि नेहमी वापरात असलेल्या वस्तू बाजूला काढाव्यात.असे म्हटले जाते की ज्या वस्तू आपण वर्षभरापेक्षा अधिक काळ न वापरता ठेवल्या आहेत,त्यांची गरज पुढे कधीही उद्भवायची वेळ सहसा येत नाही.त्यामुळे अश्या वस्तू न ठेवणे चांगले. ड्रेसिंग टेबल वरील पर्फ्यूम,कॉस्मेटिक्स वगैरेंची एक्सपायरी डेट तपासून पाहावी. कॉस्मेटिक्स वरून दिसायला कितीही चांगले दिसत असले तरी एक्सपायरी डेट उलटून गेल्यावर वापरू नये. हीच गोष्ट औषधांनाही लागू आहे. औषधांच्या कॅबिनेट मधील टॅब्लेट्स,सिरप्स एक्सपायरी डेट उलटून गेल्यास लगेच टाकून द्यावी. जुने बेल्ट्स,पर्सेस,पिशव्या वगैरे ठेवण्याचा मोह टाळावा.

३. बैठकीच्या खोलीमधील शोभेच्या वस्तू नको असल्यास देऊन टाकाव्यात किंवा मोडल्या असल्यास काढून टाकाव्यात. त्याचप्रमाणे पुस्तके किंवा मासिके वाचून झाल्यानंतर नको असल्यास काढून टाकावी किंवा एखाद्या वाचनालयाला देऊन टाकावी.जुनी वर्तमानपत्रे,जाहिरातींची हॅंडबिल्स इत्यादी साठू देऊ नये. महत्वाच्या नोटिसेस,बिले,आणि इतर कागदपत्रे इतस्ततः पडू न देता,वेगवेगळा फाईल्स बनवून त्यात ठेवावीत.उदाहरणार्थ टेलेफोनची बिले,वीजबिले,इन्शुरन्स वगैरेंच्या संदर्भातली कागदपत्रे,घराच्या संबंधीची कागदपत्रे त्या त्या फाईल्स मध्ये ठेऊन प्रत्येक फाईलला व्यवस्थित लेबल लावावे.त्यामुळे कुठलीही कागदपत्र गरज लागताच,शोधाशोध न करता पटकन हाताशी येतात.

४. घरामध्ये लहानमोठ्या दुरुत्यांच्या निमित्ताने अनेक वस्तू आणल्या जातात- खिळे,हातोड्या,पकडी,स्क्रूड्राइव्हर्स,आणि अजूनही बरेच काही. काम झाल्यावर या वस्तू इकडेतिकडे ठेवल्या जातात आणि पुन्हा गरज लागली कि सापडत नाहीत.अश्या वस्तूंसाठी एक टूलबॉक्स असल्यास या वस्तू व्यवस्थित एकत्र ठेवणे सहज शक्य होते.

५. कित्येकदा आपल्या घरी एकाचप्रकारच्या अनेक वस्तू असतात.गृहोपयोगी उपकरणे हे याचे अगदी सोपे उदाहरण.म्हणजे एखाद्याकडे फूड प्रोसेसर पण असेल,मिक्सर ग्राइंडर पण असेल,हॅन्ड ब्लेंडर पण असेल.त्यामुळे ज्या वस्तूचा उपयोग आपल्याला सगळ्यात कमी असेल अशी वस्तू देऊन टाकण्याचा विचार जरूर करावा.

अश्या प्रकारे घरात साठत जाणाऱ्या सामानाकडे वेळीच लक्ष देऊन,अनावश्यक वस्तूंची वेळीच योग्य ती विल्हेवाट लावल्याने decluttering अगदी सोपे होऊन जाते.

Leave a Comment