निरनिराळे रंग आणि त्यांचे प्रभाव


कपडे किंवा तत्सम इतर वस्तू खरेदी करत असताना आपण आपल्या आवडत्या रंगांना नेहमीच प्राधान्य देत असतो. फक्त कपडेच नव्हे, तर आपल्या पसंतीच्या रंगांमध्ये असलेल्या इतरही अनेक वस्तूंकडे सुद्धा आपले हटकून लक्ष जाते. आपल्या पसंतीचे रंग आपल्या घरामध्येही आपण आवर्जून वापरत असतो – मग ते सजावटीच्या वस्तूंच्या माध्यमातून असो किंवा भिंतींची केलेली रंगसंगती असो, पडदे, कुशन्स, अश्या एक ना अनेक गोष्टींमधून आपल्याला भावणारी रंगसंगती आपल्या घराच्या कानाकोपऱ्यातून दिसून येत असते. ह्या निरनिराळ्या रंगांना देखील स्वतःची खासियत आहे. वास्तुशास्त्रानुसार, आपण घरामध्ये वापरलेल्या रंगांचा विशेष परिणाम, घराच्या वातावरणावर आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर होत असतो. त्यामुळे घराच्या रंगसंगतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांची निवड करत असताना काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे ठरेल.

पिवळा : पिवळा रंग हा साधारणतः आनंदी, उत्साही वातावरणाशी आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. त्यामुळे हा रंग माफक प्रमाणात स्वयंपाकघरामध्ये किंवा जिथे घरातल्यांचा आणि पाहुणे मंडळींचा वावर जास्त असेल ( उदा. बैठकीची खोली ) अश्या ठिकाणी वापरावा. घराच्या प्रवेशद्वारापाशी हा रंग वापरल्यास, घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती प्रसन्न मनाने घरात प्रवेश करते. पण ह्या रंगाचा वापर माफक प्रमाणात आणि इतर रंगांच्या जोडीने करावा.

निळा : आकाशाचा विस्तार आणि सागराचे अथांगपण दर्शविणारा हा रंग शीतलता आणि मनःशांती प्रदान करणारा आहे. त्यामुळे विश्रांतीच्या ठिकाणी या रंगाचा वापर करावा. ( उदा. बेडरूम ). हलका निळा रंग, गडद निळ्या रंगापेक्षा जास्त प्रभावी मानला गेला आहे. हा रंग बुद्धिमत्तेला चालना देणारा आणि उत्पादकता वाढविणारा आहे. त्यामुळे आपल्या काम करण्याच्या ठिकाणी ह्या रंगाचा वापर करावा.

गुलाबी : हा रंग आपापसातले स्नेह-संबंध तर दर्शवितोच, पण त्याचबरोबर ह्या रंगाचे आपल्या शरीरावर होणारे अनेक परिणाम लक्षात घेण्यासारखे आहेत. विशेषतः शारीरिक श्रमांमुळे जाणवणारा थकवा, व्यायामामुळे वाढलेली श्वासाची, हार्ट बीट्स आणि पल्स ची गती, ह्या रंगाच्या प्रभावामुळे आटोक्यात आणायला मदत होते. हा रंग मनस्वास्थ्य देणारा आणि नजरेला सुंदर असा आहे.

लाल : हा रंग जठराग्नी प्रदीप्त करणारा आहे. त्यमुळे डायनिंग रूम मध्ये या रंगाचा वापर माफक प्रमाणात करायला हरकत नाही. हा रंग, त्या ठिकाणी जमलेल्या व्यक्तींच्या मध्ये संभाषण प्रेरित करणारा आहे. त्यामुळे घरात बैठकीच्या खोलीमध्ये किंवा ऑफिस मध्ये conference room मध्ये ह्या रंगाचा वापर करता येईल.

हिरवा : हा रंग, भरभराट, स्थैर्य आणि मनःशांती देणारा आहे. निसर्गच्या सान्निध्यात आपल्याला नेणारा हा रंग, उत्साह वाढवणारा आहे. घरामध्ये, फुलझाडे, एखादी accent wall, कुशन्स, पडदे या माध्यमांच्या सहाय्याने हिरव्या रंगाचा वापर करता येईल.

Leave a Comment