आत्मविश्वास – यशाची गुरुकिल्ली..


आजचे व्यावसायिक जग हे चढाओढीचे आहे. व्यावसायिक दृष्ट्या प्रत्येकजण स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. या प्रयत्नांना यश तेव्हाच येते जेव्हा अविरत कष्टांना जोड असते दृढ आत्मविश्वासाची. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण उत्कृष्ट रीत्या पार पाडू शकू याची खात्री, आपल्या आसपासच्या लोकांवर पडणारी आपल्या व्यक्तिमत्वाची प्रभावी छाप, आपल्या वागण्या-बोलण्यातली सहजता, ही दृढ आत्मविश्वास असलेल्या व्यक्तींची स्वभाववैशिष्ट्ये म्हणता येतील. पण, सगळ्याच व्यक्तींना आत्मविश्वासाने वावरता येतेच असे नाही. किंबहुना, कष्ट करण्याची तयारी, दिलेली जबाबदारी किंवा कामे पार पाडण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे असून देखील केवळ आत्मविश्वासाच्या अभावी मागे राहिलेली माणसे आपण वेळोवेळी पाहात असतो. आपल्याला जबाबदारी पेलता येईल किंवा नाही, यश न मिळाल्यास काय होईल, आपली मते इतरांना पटवून देता येतील किंवा नाही, या आणि अश्या अनेक प्रश्नांची काळजी सतत त्यांच्या मनात असते. पण याच दृष्टीकोनात थोडा जाणीवपूर्वक बदल केला तर आपला आत्मविश्वास खचितच वाढेल आणि व्यावसायिक दृष्ट्या आपण आपले स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण करू शकू.

१.आपल्या ध्येयाकडे आपण करत असलेल्या वाटचालीमध्ये कधी लहान-मोठ्या अडचणी येत असतात. अश्या प्रसंगी धैर्य न गमावता अडचणींना सामोरे जावे. कधी कधी मनावरचा ताण इतका जास्त असतो की आपण आपल्या ध्येयाची पाठ सोडायला देखील तयार होतो. पण तसे न करता, विचारपूर्वक मार्ग निवडावेत. गरज लागल्यास आपल्या सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. नुसत्या तक्रारी करत बसण्यापेक्षा, आलेल्या अडथळ्यांतून कसा मार्ग काढता येईल याचा विचार करावा.

२. आपल्याला सोपविलेल्या कामाच्या बाबतीत चालढकल करणे टाळावे. “नंतर बघू” , किंवा “वेळ आली की करू” असा विचार करून कित्येकदा कामे पुढे ढकलली जातात. यासाठी अनेक कारणे असू शकतात. कधी कामासंबंधी निर्णय घेता येत नाही म्हणून, किंवा टीम मधल्या सहकाऱ्यांशी एकमत नाही म्हणून, किंवा इतरही अनेक प्रश्न असता, त्यावर वेळीच उपाययोजना करून असे प्रश्न वेळ न घालवता सोडवायला हवेत. बहुतेक प्रसंगी एकमेकांशी मनमोकळेपणाने केलेल्या चर्चेने असे प्रश्न सुटतात, पण चर्चा आपल्याकडून सुरु करायचा प्रयत्न जरूर करावा.

३. “बदल”, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, सहसा लवकर स्विकारला जात नाही. आपली काम करण्याची पद्धत, विचारपद्धती आपण सहसा बदलायला तयार नसतो. कधी कधी त्यामुळे देखील आपले काम पार पाडण्यात आपल्याला अडचणी येतात. अश्यावेळी आपल्या “कम्फर्ट झोन” मधून बाहेर पडून, काम करण्याची नवीन पद्धत अंगिकारून, आपल्याला करावयाचे असलेले काम अधिक नाविन्यपूर्ण पद्धतीने कसे करता येईल, याचा विचार जरूर करावा.

४. आपल्या निर्णयांनी, किंवा मतांनी सगळ्यांचीच मने जिंकून घेणे नेहमीच शक्य होत नसते. अश्या परिस्थितीत आपण आपल्या ध्येयापासून विचलित न होता काम करावे. सगळ्यांना सतत खूश ठेवता येतेच असे नाही आणि तशा प्रयत्नात आपली ओढाताण होत नाही ना हे बघावे. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या व्यक्तींमध्ये, आपण घेतलेल्या निर्णयांबद्दल, आपल्या मतांबद्दल, आपल्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल सतत नकारात्मक मते प्रदर्शित करणारी मंडळी असतात. अश्या व्यक्तींची मते फारशी मनावर न घेता आपण स्वतःचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे.

५. कित्येकदा आपण अथक प्रयत्न करूनही म्हणावे तसे परिणाम आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे आपला आत्मविश्वास खचून जातो. अश्यावेळी काम करण्याच्या नवनवीन पद्धती अवलंबणे, त्याचबरोबर वेळप्रसंगी वरिष्ठांचा किंवा सहकाऱ्यांचा सल्ला घेणे हिताचे ठरते.

६. आपल्याला मिळत असलेल्या यशापयशाची किंवा आपल्या कुवतीची तुलना इतरांशी करणे टाळावे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, विचार प्रक्रिया, निर्णय घेण्याची क्षमता वेगळी असते. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करून आपली जबाबदारी, काम सांभाळायला हवे. संपूर्ण विचार करून आखलेल्या आपल्या कामाच्या आराखड्यावर विश्वास ठेऊन केलेल्या नियोजनानुसार एकेक पायरी चढत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी.

Leave a Comment