अन्न गरम करून खाणे घातक


आयुर्वेदामध्ये ताज्या अन्नाचे महत्त्व फार सांगितले आहे. तयार झाल्याबरोबर एकदम अन्न खाल्ले तर ते लगेच पचन होते. त्यामुळे एरवी दोन पोळ्या खाणारा माणूस तव्यावरून ताटात इतकी गरम पोळी वाढली की अशा चार पोळ्या खातो आणि त्या चारीही पोळ्या त्याला सहज पचतात. अर्थात आपल्या सर्वांनाच नेहमी गरम गरम ताजे अन्न खायला मिळेलच असे नाही. त्यावर एक शॉर्टकट म्हणून आपण सकाळी तयार झालेले अन्न संध्याकाळी खाताना गरम करून खातो. त्यामुळे आपण कसले का होईना पण गरम अन्न खात आहोत याचे एक फसवे समाधान आपल्याला मिळते. सकाळचे अन्न संध्याकाळी कितीही गरम केले तरी ताज्या अन्नाची बरोबरी त्याला येत नाही. काही पदार्थांमध्ये तर असा गुणधर्म आहे की ते पदार्थ नंतर पुन्हा पुन्हा गरम केले तर घातक ठरतात.

आपण बटाट्याची भाजी पुन्हा गरम केली तर तिच्यातला सत्त्वांश नष्ट होतो. एवढेच नव्हे तर बटाट्याची भाजी नुसती दिवसभर सामान्य तापमानाला घरात ठेवली तरी ती विषारी होऊ शकते. अशी भाजी खाल्ल्यानंतर मळमळायला लागते. एवढेच नव्हेतर विषबाधासुध्दा होऊ शकते. भाताच्या बाबतीतसुध्दा असेच घडते. भात थंड करून ठेवला आणि खाण्याआधी पुन्हा गरम केला तर त्यातल्या काही घटकांचे रुपांतर विषात होते. एवढेच नव्हे तर तयार झालेला भात सामान्य तापमानाला घरात ठेवला तर तो खराब होतो. तो खाल्ल्यास हगवण लागू शकते आणि काही वेळा उलटीही होते. सर्वाधिक पोषणद्रव्ये पुरवणारी अंडीसुध्दा हाच गुणधर्म बाळगून असतात. अंड्याचे कालवण पुन्हा गरम केले तर पचनसंस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो.

पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वाधिक पौष्टिक आणि लोहयुक्त भाजी मानली जाते. तिच्यामध्ये नायटे्रटस् आणि आयर्न विपुल असते. मात्र सकाळी तयार करून ठेवलेली पालकाची भाजी संध्याकाळी खाण्यापूर्वी गरम केली तर तिच्यातील नायट्रेटचे रुपांतर नायट्राईटस्मध्ये होते. जे नायट्राईटस् कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतात. बीटचे सारे गुणधर्म याबाबतीत पालकाच्या भाजीसारखेच असतात. मशरुम आणि चिकन यांच्यातही पुन्हा पुन्हा गरम केल्यास कर्करोगास कारणीभूत ठरणारी द्रव्ये तयार होतात. साधारणतः आपल्या खाण्यात नसलेल्या ग्रेपसीड आईल, वॉलनट ऑई, अहोकेडो ऑईल आणि हेजलनट ऑईल या तेलांच्या बाबतीतही असेच घडते. पण आपण ही तेले वापरत नाही. त्यामुळे आपल्याला काही धोका नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment