नुकतीच प्रसूत झालेली महिला आहाराच्या बाबतीत सतत संभ्रमात असते. मात्र आपल्या परंपरेने या संबंधात केलेले काही कडक नियम तिच्या मनातील संभ्रम दूर करण्यास उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही नवीन मातेला काय खावे आणि काय खावू नये याचा निर्णय घेताना जसा स्वतःचा विचार करावा लागतो तसाच आपल्या बाळाचाही विचार करावा लागतो. तिच्या खाण्यात काही अरबटचरबट आले आणि तिचे पित्त वाढले तर त्याचा परिणाम बाळाचे पित्त वाढण्यावर होतो. म्हणून तिला फार जपून खावे लागते. परंतु फार म्हणजे फार जपून खाल्ले तर बाळंतपणात झालेली शरीराची झीज नीट भरून येत नाही. म्हणून पोषक अन्न खावेच लागते. परंतु तेही खाताना जाडी वाढणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते. शिवाय ती जे काही खाईल त्यावरच तिचे दूध आणि परिणामी ते दूध पिणार्या बाळाची वाढ अवलंबून असते. हेही तिला लक्षात ठेवावे लागते. अशा प्रकारे ही तारेवरची कसरत असते.
मातेसाठी पोषक आहार आवश्यक
म्हणून आधुनिक काळातील आहारतज्ञ अशा नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलांना डेअरी प्रॉडक्टस् जरुर सेवन करण्याचा सल्ला देतात. मग ते डेअरी प्रॉडक्ट चीजच्या स्वरूपात असो की दुधाच्या स्वरूपात असो. अशा महिलांनी काही कारणांनी बाळंतपणात वजन वाढले असेल तर ते वजन वेगाने कमी करण्यासाठी कसलेही डाएटिंग करणे टाळावे. कारण तसा काही प्रयत्न केला तर तिच्या दुधावर परिणाम होऊ शकतो. अशा महिलांनी आपल्या जेवणामध्ये ब्राऊन राईस वापरावा. या राईसमुळे वजनावर नियंत्रण राहतेच पण आवश्यक त्या कॅलरिजही प्राप्त होतात.
बाळंतपणानंतर महिलांनी अंडी जरुर खावीत. त्यामुळे तिच्या दुधाची प्रत सुधारते आणि अशा दुधामुळे बाळाच्या मेंदूची चांगली वाढ होते. द्विदल धान्यांचा वापर तिच्या शरीरातील ड जीवनसत्त्वाची वाढ होण्यास उपयोगी पडतो. संत्रे, मोसंबी, अशी फळे तिच्यासाठी आवश्यक असतात. गरोदर महिलेपेक्षाही प्रसूत झालेल्या महिलेला क जीवनसत्त्वाची जास्त गरज असते. त्यामुळे तिची एनर्जी लेवल वाढते. हिरव्या पालेपाल्या भाज्याही जरुर सेवन कराव्यात. विशेषतः पालक, मेथी या भाज्या तिला आवश्यक असतात. अंगावर बाळाला दूध पाजणार्या महिलांना डी हायड्रेशन होण्याची मोठीच शक्यता असते. त्यामुळे त्यांनी भरपूर पाणी पिले पाहिजे.