नोकरी-व्यवसायासाठी वेशभूषा कशी असावी?


बाजारात किंवा एखाद्या प्रदर्शनामध्ये गेल्यानंतर एखादी वस्तू अचानक आपले लक्ष वेधून घेते. मग ती वस्तू आपण अजून काळजीपूर्वक नजरेखालून घालतो, आणि सर्वार्थाने ती वस्तू पसंत पडल्यास त्या वस्तूची खरेदीसुद्धा केली जाते. या सगळ्या प्रक्रियेमागे कुठला विचार असतो,काय कारण असते याचा जर आपण विचार केला,तर आपल्या लक्षात येते की त्या वस्तूची आपल्यावर पडलेली प्रथमदर्शनी छाप ही अतिशय प्रभावशाली असते,जेणेकरून त्या वस्तूबद्दल अधिक जाणून घेण्याचे कुतूहल आपल्यामध्ये जागे होते.त्या वस्तूचा रंग,आकार,एकंदर सौंदर्य आपल्याला सर्वप्रथम आकर्षित करतात. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर वस्तू कशी दिसते यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतात- म्हणजेच वस्तूची उपयुक्तता,मूल्य या गोष्टी विचारात घेतल्या जातात.आणि सगळे काही पटण्याजोगे असले म्हणजे ती वस्तू खऱ्या अर्थाने आपल्या मनाला भावते. व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा काहीसे असेच म्हणता येऊ शकेल. आपली वेशभूषा, बोलण्या-चालण्याची पद्धत,त्यातली सहजता आणि आत्मविश्वास या सगळ्या गोष्टींची आपल्या आसपासच्या लोकांवर प्रथमदर्शनी सकारात्मक छाप पडत असते. विशेषकरून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी याचा विचार जरूर करायला हवा. कामाच्या निमित्ताने, ऑफिसमध्ये किंवा ऑफिसबाहेर आपला अनेकविध लोकांशी संपर्क होत असतो. अश्या वेळी आपली वेषभूषा कशी असावी याबद्दल थोडेसे..

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, ऑफिसमध्ये जाताना केलेली वेशभूषा सुटसुटीत,आरामदायी तर असावीच,त्याच बरोबर ऑफिसच्या औपचारिक वातावरणाला साजेशी असावी. आपला पेहराव आपल्याला दिवसभर अंगावर बाळगायचा आहे हे लक्षात ठेऊन कपड्यांची,किंवा त्या बरोबर घालायच्या दागिन्यांची,पादत्राणांची निवड करावी. कपड्यांच्या रंगसंगतीकडे विशेष लक्ष द्यावे. आजकालचा महिलावर्ग ऑफिसला जाताना पारंपारिक आणि पाश्चात्य या दोन्ही प्रकारच्या वेशभूषा पसंत करतो. पारंपारिक वेषभूषेमध्ये कुर्ता,सलवार,पलाझो,साडी इत्यादी पेहराव समाविष्ट आहेत,तर पाश्चात्य वेषभूषेमध्ये फॉर्मल शर्ट्स,पँट्स,किंवा स्कर्ट्स अधिकतः वापरले जातात. पारंपारिक वेशभूषा करताना घातले जाणारे सलवार-कुर्ता किंवा पंजाबी सूट फॉर्मल किंवा सेमिफॉर्मल असावेत. म्हणजेच जास्त झगमगीत,भडक रंगांचे नसावेत.कुर्ते आणि लेगिंग्स किंवा पलाझोचे कॉम्बिनेशन करताना रंगसंगती चांगली दिसेल याची काळजी घ्यावी. कॉटनचे कुर्ते वापरत असल्यास कुर्त्यांना माफक स्टार्च असावा. साड्यांच्या बाबतीत सुद्धा हेच नियम लागू आहेत. ऑफिससाठी वापरायच्या साड्या शक्यतो जास्त भरजरी, जड नसाव्यात.त्याचबरोबर साडी जर व्यवस्थित पिनअप केलेली असेल तर हाताळायला सोपी होते. सलवार-कुर्त्याच्या बरोबर दुपट्टा घ्यायचा झाल्यास तो ही व्यवस्थित पिनअप करणे चांगले.त्यामुळे गाडी चालवताना किंवा ऑफिसच्या कामाच्या धावपळीत त्याची अडचण होत नाही.महिलांनी पाश्चात्य वेशभूषा करताना जीन्स,टी-शर्ट्स ऑफिससाठी वापरणे टाळावे. फॉर्मल शर्ट्स,पँट्स,किंवा स्कर्ट्स वापरणे उत्तम. गडद रंगांच्या शर्ट्स वर गडद रंगाच्या पँट्स किंवा स्कर्ट्स शोभून दिसतात,तसेच हलक्या रंगांच्या शर्ट्स किंवा टॉप्स बरोबर हलक्या रंगाचे स्कर्ट्स किंवा पँट्स शोभून दिसतात. आपल्या पेहरावाच्या रंगांशी जुळेल अश्या रंगाचा एखादा स्कार्फ सुद्धा पाश्चात्य पोशाखाला अजूनच आकर्षक बनवतो.

“मेकअप” किंवा प्रसाधन हा देखील वेशभूषेचा महत्वाचा भाग आहे. ऑफिससाठीचे प्रसाधन फार भडक नसावे. लिपस्टिक, आय-शॅडो, आय-लायनर, यांच्या छटा काळजीपूर्वक निवडाव्यात. आजकाल जास्त काळापर्यंत चेहऱ्यावर टिकून राहतील अशी “वॉटरप्रूफ” प्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. “accessories” च्या बाबतीत बोलायचे झाले तर फार जास्त दागिने घालण्याचा मोह आवर्जून टाळायला हवा. मोजके पण सुंदर दागिने आपल्या वेशभूषेला कॉम्पलिमेन्ट करणारे असावेत. आपण ऑफिससाठी वापरत असलेली पादत्राणे दिसायला आकर्षक आणि आपल्या फॉर्मल किंवा सेमी-फॉर्मल वेशभूषेला साजेशी तर हवीतच, त्याचबरोबर दिवसभरासाठी वापरण्याच्या दृष्टीने देखील सोयीची असावीत. कधी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनच्या निमित्ताने खूप वेळ उभे राहताना पादत्राणे आरामदायी असणे गरजेचे ठरते. महिलांसाठी “pumps”, “बॅले-pumps”, सँडल्स इत्यादी प्रकार पारंपारिक आणि पाश्चात्य अश्या दोन्ही वेषभूषांवर शोभून दिसतात.पादत्राणांच्या टाचांची उंची आपल्याला ऑफिसमध्ये वावरताना अडचणीची ठरू नये इतपत असावी. पुरुषांसाठी मात्र फॉर्मल लेस-अप्स किंवा ब्रोग्स हेच पर्याय उत्तम. वेशभूषेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास फॉर्मल शर्ट्स व पँट्स हा पोशाख पुरुषांसाठी सर्वमान्य आहे. जीन्स, टी शर्ट्स वापरणे टाळावे. थंडीच्या दिवसांमध्ये लेदर जॅकेट किंवा डेनिम जॅकेट ऑफिसमध्ये वापरणे टाळावे. त्या ऐवजी ट्वीड किंवा वूलन कोट,किंवा फॉर्मल स्वेटर वापरणे चांगले.आपली एतद्देशीय “बंडी” सुद्धा आता नवीन फॅशनेबल रूपामध्ये पुनश्च अवतरली आहे. रंगसंगती साधून निवडलेली बंडी फॉर्मल शर्ट-पॅन्टवर शोभून दिसते. पुरुषांसाठी विशेषकरून वापरल्या जाणाऱ्या accessories मध्ये कफलिंक्स, टाय वापरत असल्यास टायपिन, बेल्ट्स इत्यादी वस्तूंची काळजीपूर्वक निवड करावी.

वेशभूषा पारंपारिक असो किंवा पाश्चात्य, त्याचे “स्टायलिंग” म्हणजेच शिवण, आणि “फिटिंग” अतिशय महत्वाचे असते. आताशा आपल्या पसंतीच्या फॅशनचे कपडे बाजारात किंवा ऑनलाईन अगदी सहज उपलब्ध असतात. तसेच कपड्यांच्या साईझ, किंवा फिट बद्दलची विस्तारपूर्वक माहिती सोबत दिली जात असल्यामुळे आपल्याला आपल्या पसंतीचे पेहराव अगदी सहज निवडता येतात. त्याचबरोबर ऑनलाईन खरेदी करताना सध्या प्रचलित असलेल्या फॅशननुसार कपडे, accessories, किंवा पादत्राणे खरेदी करता येतात. अश्याप्रकारे वेशभूषेच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपली वेशभूषा आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यास मदत करते.

Leave a Comment