इतरांसमोर आपली मते मांडताना..


आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण सहकारी, वरिष्ठ आणि कामानिमित्त बाहेरच्या ऑफिसेस मधून भेटणारी मंडळी.. अश्या कितीतरी मंडळींच्या संपर्कात सदैव येत असतो. आपण करत असलेल्या कामाची नेमकी दिशा ठरवण्यासाठी किंवा काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आपल्या आपपसात चर्चाही होत असतात. अश्या चर्चांमध्ये मतभेदही होतात. आपले मत इतरांनी ऐकून घ्यावे इतकेच नाही, तर ते इतरांना पटायला देखील हवे असे प्रत्येकालाच वाटत असते. आपले मत प्रभावीपणे पटवून देता येणे हे ही एक कसब आहे असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही. आपण आपल्या मताबद्दल आग्रही असावे, पण या आग्रहाचे पर्यवसान दुराग्रहात, किंवा अट्टाहासात होऊ नये याचा विचार, आपली मते मांडताना आपण करायला हवा.

कित्येकदा आपल्या म्हणायचे एक असते, पण प्रत्यक्षात बोलाताना मात्र आपण नेमकेपणाने आपले मत मांडू शकत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल आपले मत मांडताना आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे तेवढेच मुद्देसूद बोलल्यास इतरांना आपले मत पटविण्यास मदत मिळते. त्यामुळे अश्या चर्चांचे कुठलेही दडपण मनावर न बाळगता आपले मत मांडावे. एखाद्याचे मत आपल्याला पटत नसल्यास त्या मागची कारणे देऊन आपले मत पटवून देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून इतरजणे आपल्या मतांचा पुनर्विचार करतील, आणि चर्चेच्या शेवटी घेतलेले निर्णय सर्वसंमत असतील.

आपले मत मांडताना इतर सहकाऱ्यांना किंवा वरिष्ठांना काय वाटेल, किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जातील का हा विचार आपण सगळेच करत असतो. त्यामुळे ज्या विषयांची मोकळेपणी चर्चा व्हयला हवी, तशी ती होताना दिसत नाही. अश्या वेळी ही भावनिक गुंतागुंत बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करून, सारासार विचार करून आपले मत मांडावे. त्यामुळे कामाची योग्य दिशा ठरविण्यास मदत होते आणि पुढे होणारे गैरसमज टाळता येतात.

आपल्या व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या निर्णयांच्या बाबतीत आपण आपली मते प्रदर्शित करत असताना आपल्या सहकाऱ्यांना किंवा वरिष्ठांना आपली सगळीच मते, कितीही योग्य असली, तरी पटतील असे नाही. पण यामध्ये आपला दोष किंवा कमीपणा आहे असे मानायचे कारण नाही. आपण मांडत असलेली मते आपल्या वैयक्तिक हितासाठी नसून व्यवसायाच्या हितासाठी आहेत याचा आत्मविश्वास बाळगून तसे आपल्या सहकाऱ्यांना किंवा वरिष्ठांना पटवून देण्याचा प्रयत्न करावा.

आपली मते मांडताना आपण शांत असावे. आपल्या भावनांवर आपले नियंत्रण असणे अत्यावाश्यक आहे. हट्टाने, जबरदस्तीने आपली मते पटवून देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या मतांचा स्वीकार इतरजणे कदाचित करतीलही, पण त्यांना आपली मते मनापसून पटणार नाहीत. याविरुद्ध आपण शांतपणे, सारासार विचार करीत आपले मत मांडले तर इतर लोक आपल्या मताचे स्वागत करतीलच, त्याचबरोबर आपला निर्णय योग्य असून प्रगतीच्या दिशेने नेणारा आहे हे ही इतरांना पटेल.

Leave a Comment