आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले जीवन कितीतरी अंशी सोपे होऊन गेले आहे. मोबाईल फोन्स, इंटरनेट मुळे जग जवळ आले. सर्वप्रकारच्या सुखसोयींनी शारीरिक कष्ट कमी झाले. पण ही सुबत्ता येताना आपल्याबरोबर काही दुष्परिणामही घेऊन आली. आजची आपली जीवनशैली ही अतिशय वेगवान, द्रुतगती झाली आहे. आपल्याला कॉफीपासून, आपण करत असलेल्या कामांच्या results पर्यंत सगळे कसे “instant” हवे असते. एकाचवेळी अनेक कामांच्या डेडलाइन्स आपण गाठत असतो, आणि आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीची काही अंशी तशी गरजही आहे, हे खरे असले तरी, त्याच्या बदल्यात आपण काय गमावतो आहोत हे पुष्कळदा आपल्या लक्षात येत नाही. शरीराला हवी असणारी विश्रांती आणि मनःस्वास्थ्याकरता आवश्यक असा विरंगुळा यांच्याकरता आपल्यापाशी वेळच उरत नाही. सण-समारंभ, नातेवाईक, मित्रमंडळींशी भेटीगाठी, लहानमोठी outings, सगळे कसे अगदी वेळेच्या चौकटीत पार पडत असते, कारण या गोष्टींमध्ये सहभागी होत असतानासुद्धा आपल्या कामाच्या डेडलाईन्स मनाच्या कोपऱ्यातून सतत आपल्याला खुणावत असतात. पाहता पाहता ब्लड प्रेशर, निद्रानाश, अश्या तक्रारी डोके वर काढू लागतात. आता तर वैद्यकीय तज्ञांनी देखील या तक्रारींना “lifestyle diseases” असे म्हटलेले आहे. आपल्या धावत्या जीवनशैलीच्या परिणामस्वरूप उद्भवणाऱ्या या तक्रारींची पहिली पायरी म्हणजे मानसिक तणाव. बहुतेक वेळी या मानसिक तणावाची जाणीव करून देणारी काही लक्षणे आपल्याला दिसून येऊनसुद्धा वेळीच केलेल्या उपाययोजनेच्या अभावी या तक्रारी आजाराचे स्वरूप धारण करतात आणि मग मात्र डॉक्टरांचा सल्ला अनिर्वाय ठरतो.
आपण मानसिक तणावाखाली आहोत का?
अचानक उद्भवणारी पोटदुखी, मळमळ, डायरिया, अपचन या सारख्या तक्रारी आपण सगळ्यांनीच अनुभवलेल्या असतात. पण या तक्रारी वारंवार उद्भवू लागल्यास त्याचा संबंध मानसिक तणावाशी असू शकतो. अचानक जास्त भूक वाढणे किंवा अचानक कमी होणे हे ही मानसिक तणावाचे लक्षण आहे. विशेषतः मुलांच्या बाबतीत परीक्षेच्या काळात ही लक्षणे पाहायला मिळतात. अश्या तक्रारींकडे वेळीच लक्ष पुरवावे.
कधीकधी एरवी शांत असणारी व्यक्ती अचानक चिडचिडी व्हायला लागते. या परिवर्तानामागे वैयक्तिक किंवा व्यावसयिक अडचणी असू शकतात, ज्याबद्दल बोलणे किंवा कुणाकडे कसल्याही प्रकारची मदत मागणे अश्या व्यक्तींना अवघड वाटत असते. अश्या वेळी त्या व्यक्तीशी संभाषण साधून त्यांची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. किती तरी वेळी संभाषणाच्या माध्यमातून असे प्रश्न सुटताना दिसतात. गरज वाटल्यास अश्या व्यक्तींना तज्ञांचा सल्ला घेण्यास प्रवृत्त करावे.
सतत जाणवणारा शारीरिक थकवा हा मानसिक तणावाचा न टाळता येणारा असा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे. कितीही विश्रांती घेतली तरी थकवा न गेल्यामुळे कसल्याही कामचा उत्साह वाटेनासा होतो. असा थकवा शरीरासाठी आणि मनासाठी अपायकारक ठरतो. मानसिक तणावामुळे हॉर्मोन्स च्या असंतुलानाबरोबरच शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. त्यामुळे मानसिक तणावाखाली असणाऱ्या व्यक्ती सतत छोट्या मोठ्या आजारांनी ग्रस्त असल्याचे दिसते. योग्य वेळी घेतलेला तज्ञांचा सल्ला या बाबतीत उपयोगी ठरतो.
आपल्या मनावरील तणाव किंवा स्ट्रेस हाताबाहेर जाऊन त्याचे दुष्परिणाम गंभीर शारीरिक व्याधींच्या माध्यमातून दिसू लागण्याआधीच उपाययोजना करणे कधीही श्रेयस्कर आहे. आपल्या कामाचे योग्य पद्धतीने केलेले नियोजन सुद्धा मनावरचा ताण हलका करण्यास मदत करते. त्याचबरोबर सहकार्यांशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी संभाषण साधल्याने आपल्या मनावरचा ताण हलका होण्यास मदत होते.