पुण्यात गर्जणार राज ठाकरे, सभेपूर्वी टीझर रिलीज, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असेल भर


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेपूर्वी एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यात ठाणे, संभाजी नगर आणि आता पुण्यातील सभांमध्ये मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर आपली ताकद दाखवेल, असे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या टीझरमध्ये औरंगाबाद हे संभाजीनगर असे लिहिले आहे. टीझरच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंनी लाऊडस्पीकर काढण्याशी संबंधित भाषणाची क्लिप जोडली आहे. 22 मे रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्याबाबतही बोलणार आहेत.

अयोध्या दौरा का पुढे ढकलला?
राज ठाकरे यांचा बहुप्रतिक्षित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्यानंतर त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थान कृष्ण कुंज येथे कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू झाला आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी अयोध्या दौरा तूर्तास रद्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी राज ठाकरेंच्या पायाचे छोटे ऑपरेशन मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये झाले. आता त्या ठिकाणी पुन्हा वेदना सुरू झाल्या आहेत.

अशा वेळी पुन्हा ऑपरेशन आवश्यक असू शकते. याच कारणामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलल्याची माहिती सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे. मात्र, 22 मे रोजी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनाही बोलावले आहे.

मग संपूर्ण महाराष्ट्र संतापाने उभा राहील!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय आंदोलन तीव्र झाले आहे. मुंबईतील लालबाग परिसरात मनसेने पोस्टर लावले आहेत. राज ठाकरे यांना कोणी नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण महाराष्ट्र संतापाने पेटेल, असे पोस्टरमध्ये लिहिले आहे. खरे तर, यूपीमधील भाजप खासदार आणि महाराष्ट्रातील काही नेत्यांनी राज ठाकरेंच्या यूपी दौऱ्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचवेळी यूपीमध्ये काही ठिकाणी राज ठाकरेंविरोधात निदर्शनेही होत आहेत. त्यावर मनसेने गुरुवारी प्रत्युत्तर दिले होते.