बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला दोषी


नवी दिल्ली – बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्ली न्यायालयाने हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवले आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीश विकास ढल यांच्या न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी शनिवारी दोषी ठरवले आहे.

शिक्षेवर कधी होणार युक्तिवाद?
ओमप्रकाश चौटाला यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता त्यांच्या शिक्षेवर 26 मे रोजी युक्तिवाद होणार आहे. किती दिवस शिक्षा होणार हे या दिवशीच स्पष्ट होणार आहे. वादाच्या वेळी ओमप्रकाश चौटाला कोर्टरूममध्ये उपस्थित होते. यापूर्वी 19 मे रोजी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता.

जेबीटी घोटाळा
हरियाणाच्या प्रसिद्ध जेबीटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री चौटाला यांना यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले आहे. INLD प्रमुखांना भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणात सात वर्षे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यानंतर या प्रकरणात चौटाला यांची शिक्षा पूर्ण झामुळे 2 जुलै रोजी त्यांची दिल्लीच्या तिहार तुरुंगातून सुटका झाली.

हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित – चौटाला
चौटाला कुटुंबीय हे आरोप फेटाळत आहेत. यासोबतच हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाच्या ताज्या निर्णयाने हरियाणाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडेल, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे.

काय होते प्रकरण

  • सीबीआयने 26 मार्च 2010 रोजी चौटाला यांच्याविरुद्ध केंद्रीय तपास संस्थेने आरोपपत्र दाखल केले होते.
  • 1993 ते 2006 दरम्यान 6.09 कोटी रुपयांची मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
  • 2019 मध्ये ईडीने चौटाला यांची 3 कोटी 68 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.