आझम खान यांना मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन


नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरच्या कोतवाली पोलिस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला आहे. निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रलंबित प्रकरणांमध्ये खालच्या न्यायालयातून नियमित जामीन घ्या. नियमित जामीन मिळेपर्यंत अंतरिम जामीन सुरू राहणार आहे. या प्रकरणी न्यायालयाने आधीच सुनावणी पूर्ण केली असून जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती एस गोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. विशेष म्हणजे आझम खान 80 हून अधिक प्रकरणांमध्ये गेल्या 26 महिन्यांपासून सीतापूर कारागृहात बंद आहेत. एकामागून एक गुन्हे दाखल झाल्याने हैराण झालेल्या आझमसाठी ही दिलासादायक बातमी आहे. आझम खान यांना ट्रायल कोर्टातून आतापर्यंत 88 केसेसमध्ये जामीन मिळाला आहे, मात्र 89व्या केसमध्ये जामिनासाठी खटला सुरू होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 चा वापर करून जामीन मंजूर केला.

यूपी सरकारने जामीन अर्जाला केला विरोध
17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी, उत्तर प्रदेश सरकारने तुरुंगात टाकलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आणि त्यांना जमीन बळकावणारा आणि सवयीचा गुन्हेगार म्हणून संबोधले.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले होते उच्च न्यायालयाला
उत्तर प्रदेश राज्यातर्फे उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनीही आझम खान यांच्या याचिकेला विरोध केला. आझम खानच्या जामीन याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल देण्यास दिर्घकाळ दिरंगाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती आणि ही न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता जामीन
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जमीन चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याच्या प्रकरणात आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. सध्या आझम खान यांना रामपूरच्या कोतवालीशी संबंधित आणखी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आझम खान यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी फेब्रुवारी २०२० पासून सीतापूर कारागृहात बंद आहे.

यूपी सरकारवर कपिल सिब्बल यांनी केले आरोप
सपा नेते आझम खान यांना जामीन मंजूर करण्याबाबत, त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आरोप केला होता की यूपी सरकार त्यांच्या अशिलाला राजकीय द्वेषाचा शिकार बनवत आहे. तसेच आझम खान दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत, त्यांना आता जामीन द्यावा, असेही ते म्हणाले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आझम खान तुरुंगात राहणार की आता मोकळ्या हवेत श्वास घेणार हे स्पष्ट होणार आहे की, त्यांना आता जामिनासाठी आणखी संघर्ष करावा लागणार आहे.