घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडर महागले


नवी दिल्ली – तेल आणि गॅस कंपन्यांनी गुरुवारी सकाळी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक डोस दिला. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा दर वाढवण्यात आले आहेत.

राजधानी दिल्लीत एलपीजी सिलिंडरने आता 1000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात 3.50 रुपयांची वाढ झाली आहे, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे.

गुरुवारपासून दिल्लीत 1003 रुपये, मुंबईत 1002.50 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये आणि चेन्नईमध्ये 1018.50 रुपयांना घरगुती एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 7 मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

आता 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईमध्ये 2507 रुपयांना मिळणार आहे. आता देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे. एका वर्षात घरगुती सिलिंडरची किंमत 800 ते 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे.

दुसरीकडे, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने बुधवारी अहवालात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सतत वाढणाऱ्या महागाईमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. या कालावधीत, संपूर्ण आर्थिक वर्षातील सरासरी महागाई दर नऊ वर्षांच्या उच्चांकी 6.9 टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे.

एजन्सीच्या मते, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक आपला व्याजदर रेपो रेट 0.75 टक्क्यांनी वाढवू शकते. परिस्थिती गंभीर झाल्यास, पॉलिसी रेट 1.25 टक्क्यांपर्यंत वाढवता येऊ शकतो. याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस रोख राखीव प्रमाण (CRR) देखील 0.50 टक्क्यांनी वाढवून 5 टक्के केले जाऊ शकते. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने 4 मे रोजी पूर्वनिर्धारित वेळापत्रकाविना रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. CRR देखील 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.5 टक्के करण्यात आला आहे.

महामारीच्या काळात मागणी कमी होऊनही किरकोळ महागाई नोव्हेंबर 2020 पर्यंत 6 टक्क्यांच्या वर राहिली. याचे एक कारण म्हणजे पुरवठा खंडित होणे. 2015-16 ते 2018-19 या सलग चार वर्षांमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर सरासरी 4.1 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. यानंतर, डिसेंबर 2019 मध्ये प्रथमच, तो 6 टक्क्यांच्या पुढे गेला होता, जो आरबीआयच्या वरच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.