AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशीला अटक, ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावर आक्षेपार्ह टिप्पणी


अहमदाबाद – AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दानिश कुरेशीने ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दानिश कुरेशीने सोशल मीडियावर शिवलिंगाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

सायबर क्राइमचे सहाय्यक पोलिस आयुक्त जेएम यादव यांनी मीडियाला सांगितले की, दानिश कुरेशी नावाच्या ट्विटर हँडलवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टमध्ये दानिश कुरेशीने उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर त्यांनी उपहासात्मक टीका केली. दानिशच्या ट्विटमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दानिशविरुद्ध दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.