‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका जवळपास गेली 13 वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकेचे निर्माते आसित मोदी यांनी लॉकडाऊननंतर अॅनिमेटेड तारक मेहता का उल्टा चष्मा लाँच केले आहे. या मालिकेवर आधारित चित्रपट आता लवकरच येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आसित मोदी यांनी स्वत: वक्तव्य केले आहे.
येणार ‘तारक मेहता का…’ मालिकेवर आधारित चित्रपट? आसित मोदी म्हणतात..
सोशल मीडियावर आसित मोदी प्रचंड सक्रिय असतात. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना ते बऱ्याचदा दिसतात. कधी दयाबेनच्या वापसीवर ते बोलतात, तर कधी पोपटलालच्या लग्नाविषयी खुलासा करतात. पण आता आसित यांना एका चाहत्याने विनंती केली आहे की तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेवर एखादा चित्रपट तयार करा. ही मालिका जगातील सर्वात चांगल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेवर चित्रपट करा. आम्ही हा चित्रपट हिट करु.
या चाहत्याला आसित मोदींनी उत्तर दिले आहे. चाहत्याचे ट्वीट रिट्वीट करत त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. उत्तर देत ‘हो’ असे आसित मोदी यांनी म्हटले आहे. आसित मोदी यांनी हो म्हणताच त्यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी आनंद व्यक्त केला आहे, तर काहींनी चित्रपटासाठी आसित यांना सल्ला दिला आहे. एकंदरीत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेवर चित्रपट येणार हे ऐकून चाहते आनंदी झाले आहेत.