आता चित्रपटांमध्येही दिसणार ‘गब्बर’चा जलवा, याच वर्षी प्रदर्शित होणार शिखर धवनचा पहिला चित्रपट


भारतीय क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवन आता अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. धवनला काही महिन्यांपूर्वी चित्रपट निर्मात्यांनी संपर्क केला होता, जो त्याने स्वीकारला आणि आता चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे. त्याचा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होऊ शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर एका मोठ्या मेनस्ट्रीम सिनेमात काम करणार आहे. यासाठी धवननेही कंबर कसली आहे. रिपोर्टनुसार, धवनने याचे शूटिंग आधीच पूर्ण केले होते. सध्या निर्मितीचे काम सुरू आहे. यासोबतच या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा धवनला चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा तो खूप खूश झाला आणि त्याने लगेच होकार दिला. चित्रपटाच्या निर्मात्यालाही धवन त्या पात्रासाठी सर्वोत्तम वाटला. धवन या चित्रपटातील मुख्य पात्रांपैकी एक असेल. हा चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, धवन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवर दिसला होता. त्यानंतर धवन राम सेतू चित्रपटाचाही एक भाग असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, धवन या चित्रपटाचा भाग असणार नाही. जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा अक्षय कुमारसोबत राम सेतूमध्ये दिसणार आहेत.

अक्षय आणि रणवीर सिंगसोबत धवनचे नाते खूप चांगले आहे. धवनने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रणवीरसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये धवनने लिहिले – भाऊ, नेहमीप्रमाणे या वेळीही तुमची भेट खूप छान झाली. धवन सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. तो पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे.