संतापलेल्या देवेंद्र फडणवीसांचा थेट राज्यातील पोलीस यंत्रणेला इशारा


पुणे – सोमवारी पुण्यात केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला. इराणी यांचा ताफा परत जात असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने करत त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध व्यक्त करत थेट राज्यातील पोलीस यंत्रणेलाच त्यांनी इशारा दिला आहे.

स्मृती इराणी या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली रंगमंदिराच्या परिसरात गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. स्मृती इराणी यांचा बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. त्यापूर्वी महागाईच्या मुद्दयावर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांनी स्मृती इराणींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट पोलीसांनाच इशारा दिलाय. रोज कायदा हातात घेत आहात आणि बेकायदेशीर कृत्य करत आहात. असे कृत्य राज्यातील सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते करु लागले, तर राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा टोला फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांना लगावला.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, स्मृती इराणींवर अशाप्रकारे केलेला हल्ला भ्याड असून आम्ही देखील त्याला जशाच तसे उत्तर देऊ शकतो. पण लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आम्ही आहोत. पोलिसांनी आम्ही संधी देत आहोत. पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल, हे देखील पोलिसांनी सांगतो, असेही फडणवीस यांनी संतापून म्हटले आहे.

दरम्यान, स्मृती इराणींच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विशाखा यांच्यासोबत असलेल्या एका मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीसाठी सुरू आहे.