हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे, तर कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल; राणांचा मुख्यमंत्र्यांना सवाल


नवी दिल्ली – खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आता दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी ही निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

महाराष्ट्रावर उद्धव ठाकरेंच्या नावाने आलेले संकट लवकरात लवकर दूर व्हावे, यासाठी हनुमान मंदिरात आरती करणार आहोत. त्यांनी मला वज्र द्यावे, मी दात तोडण्याचे काम करेन, असे सांगितले आहे. माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचे असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल, असे नवनीत राणा म्हणाल्या.

संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्याचवेळी त्यांच्याविरोधात हार अर्पण केले जात असतील, तर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री कुठे गेले, हा माझा प्रश्न आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे, तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.