युद्धाचे भविष्य कोणालाच माहीत नाही: रशियन हल्ल्यादरम्यान झेलेन्स्कींनी केले देशाला संबोधित, म्हणाले- आमच्या लोकांनी खूप काही पणाला लावले आहे


कीव्ह – रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. असे असूनही कोणताही देश मागे हटण्यास तयार नाही. शेकडो सैनिक, शस्त्रे आणि इतरांचे नुकसान होऊनही हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, हे युद्ध किती काळ चालेल हे कोणालाच माहीत नाही. याचा अंदाजही कोणी बांधू शकत नाही.

शुक्रवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना, झेलेन्स्की म्हणाले, युद्धाचा परिणाम केवळ आपल्या लोकांवर अवलंबून राहणार नाही, ज्यांनी आधीच आपले जीवन पणाला लावले आहे. दुर्दैवाने हे आमचे भागीदार देश, युरोपियन देश आणि मुक्त जगावरही अवलंबून असेल.

राष्ट्राला दूरचित्रवाणीद्वारे संबोधित करताना, झेलेन्स्की म्हणाले की युक्रेनियन सैन्याने रशियन सैन्याच्या ताब्यातून गावे आणि शहरे पुन्हा ताब्यात घेतली आहेत. येथील वीज, पाणी आणि दळणवळण सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, डॉनबास प्रदेशात नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना युक्रेनियन सैन्याने चिलखत वाहनांच्या रशियन ताफ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर दोघांमधील ही पहिलीच चर्चा आहे. मात्र, या दूरध्वनी संभाषणात रशियाने युद्ध संपवण्याचे संकेत दिले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, युरोपियन युनियनने (EU) युक्रेनला अधिक लष्करी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.