किम जोंगने घेतला कोरोनाचा धसका : उत्तर कोरियात हाहाकार, हुकूमशहा म्हणाला- इतिहासातील सर्वात मोठे आव्हान देशासमोर


प्योंगयांग – उत्तर कोरियामध्ये कोरोनाने आता कहर करायला सुरुवात केली आहे. देशात 17 हजारांहून अधिक नवे बाधित आढळले असून आणखी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती पाहता हुकूमशहा किम जोंग उन यांनीही धसका बसला आहे.

उत्तर कोरियाची राज्य वृत्तसंस्था KCN नुसार, किम जोंग उन म्हणाले की, देश आपल्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. स्पुतनिक वृत्तसंस्थेने KCN च्या हवाल्याने म्हटले आहे की, किमने देशात अँटी-कोरोनाव्हायरस व्यवस्था करण्यासाठी आणि संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

देशात 17,400 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. यासह एकूण बाधितांची संख्या 5,20,000 वर पोहोचली आहे. उत्तर कोरियाने शुक्रवारी पहिल्या मृत्यूपासून एकूण सहा मृत्यूची पुष्टी केली होती, आता आणखी 21 मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) नुसार, कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर गुरुवारी उत्तर कोरियामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आता कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार देशात कहर करत आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग यांनी तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि आणीबाणीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.

उत्तर कोरियाने कोरोनाचे वर्णन पूर्वी अज्ञात ताप असे केले होते. राज्य माध्यमांनी सांगितले होते की, उत्तर कोरियामध्ये कोरोनामुळे लाखो लोकांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत. हजारो लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या कहरामुळे कोरोनामुक्त देशाचा दावा फोल ठरला आहे. जवळपास दोन वर्षांपासून, देशात सर्वात कठोर अँटीव्हायरस प्रणाली आहे, परंतु ओमिक्रॉन प्रकारने त्यांचा दावा खोडून काढला आहे. या अभूतपूर्व संकटातून देशाला बाहेर काढू, अशी प्रतिज्ञा किम जोंग यांनी घेतली आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शक्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे चीनचीही स्थिती कोरोनापेक्षा वाईट आहे. बीजिंग आणि शांघाय सारख्या शहरांच्या मोठ्या भागात कोरोना निर्बंध लागू आहेत.