रामदास आठवलेंना काँग्रेसचा सल्ला, राज ठाकरेंना उद्देशून केल्या त्या गोष्टी मोदींनाही सांगाव्यात


मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या प्रश्नावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुरुवारी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी निशाणा साधला. संविधानाने देशाचा कारभार चालतो, त्यामुळे कोणी भोंगे काढण्याची, भोंगे वाजविण्याची वक्तव्य करून समाजात दुही आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असा सल्लाही आठवलेंनी दिला. नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलताना आठवलेंनी राज ठाकरेंना उद्देशून केलेल्या वक्तव्यांवरुन आता काँग्रेसने प्रतिक्रिया देताना आठवलेंना राज ठाकरेंबद्दल केलेल्या टीकेतील काही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सांगाव्यात, असा खोचक टोला लगावला.

भगवा रंग गौतम बुद्धांचा आहे. बुद्ध आणि भगवा रंग शांततेचा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत राज ठाकरे हे तयार झालेले असल्यामुळे वाद करण्यापेक्षा वाद मिटविण्याचे काम करावे. अंगावर भगवा घेतल्यावर वाद नको, असेही ते म्हणाले आहे. याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया देताना आठवलेंना एक सल्ला दिला आहे.

सावंत यांनी ट्विटरवरुन आठवलेंनी संविधानाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हे मोदींनाही सांगावे, असा सल्ला दिला आहे. सोनाराने मनसेचे कान टोचले, हे चांगले झाले. अशीच कानटोचणी आठवले साहेबांनी भाजप व संघाच्या नेत्यांची करावी. मोदींना मंत्रीमंडळ बैठकीत सांगितले तरी चालेल, असे सावंत यांनी म्हटले आहे.