श्रीकृष्ण जन्मभूमी: ज्ञानवापी मशिदीनंतर मथुरा मशिदीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल


मथुरा – मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरालगत असलेल्या ईदगाह मशिदीचे आयुक्तांमार्फत सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मनीष यादव यांची मथुरा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी मनीष यादव, महेंद्र प्रताप सिंग आणि दिनेश शर्मा यांनी स्वतंत्रपणे अशीच याचिका दाखल करून न्यायालय कमिशनरची नियुक्ती करून इदगाह मशिदीचे व्हिडिओग्राफी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना 1 जुलै ही तारीख दिली आहे. ही याचिका स्वीकारायची की फेटाळायची, याचा निर्णय आता 1 जुलै रोजी न्यायालय घेणार आहे.

महेंद्र सिंह म्हणतात की, ‘श्रीकृष्ण जन्मस्थान आणि इदगाह मस्जिद प्रकरणात त्यांनी सर्वप्रथम 24 फेब्रुवारी 2021 रोजी व्हिडिओग्राफी आणि आयुक्तांच्या नियुक्तीची मागणी करणारा अर्ज दिला होता. यानंतर पुन्हा एकदा 9 मे 2022 रोजी अर्ज देण्यात आला.

मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद वादाचे प्रकरण लवकर निकाली काढण्याच्या याचिकेवर गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने मथुरा न्यायालयाला जास्तीत जास्त चार महिन्यांच्या कालावधीत सर्व अर्ज निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्ड आणि इतर पक्ष सुनावणीला उपस्थित न राहिल्यास एकतर्फी आदेश जारी करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नारायणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष यादव यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात याचिकाकर्त्याने मथुरेमध्ये सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी दैनंदिन आणि लवकर निकाली काढण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाशी संबंधित सर्व खटले मथुरा न्यायालयात प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर निकाली काढावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान विरोधी पक्ष हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करून एकतर्फी आदेश देण्यात यावे.