मुंबई – सध्या औरंगाबाद दौऱ्यावर एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी असून त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे गुरुवारी दर्शन घेतले. त्यांच्यासोबत यावेळी इम्तियाज जलील, वारीस पठाण यांची उपस्थिती होती. आता यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून एमआयएम नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता एमआयएम नेत्यांनी हे तुम्ही दिलेले आव्हान असून आपण स्वीकारले असल्याचे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच याच मातीत औरंगजेबाला गाडले होते, हे विसरु नका असा इशारा दिला आहे.
एमआयएम नेत्यांवर टीकेची झोड; राऊत म्हणाले, औरंगजेबाला याच मातीत गाडले होते हे विसरु नका
वारंवार संभाजीनगरला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे आम्हाला सर्वांना, महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकत महाराष्ट्रात अशांतता निर्माण कऱण्याचे राजकारण ओवेसी बंधूंचे दिसत आहे. पण मी एवढेच सांगेन की महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी औरंगजेबाची कबर बांधली आहे. आम्ही त्याला कबरीत टाकले आहे. तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
औरंगजेब हा काही महान संत नव्हता. महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केले, मंदिरे उद्ध्वस्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर मराठा योद्ध्यांनी त्याच्यासोबत लढाई लढली आहे. पण आता त्याच औरंगजेबाच्या कबरीचे महाराष्ट्रात येऊन दर्शन घेणे हे एकप्रकारे आव्हान दिल्यासारखे आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारतो. आम्ही याच मातीत औरंगजेबाला गाडले होते आणि जे औरंगजेबाचे भक्त आहेत, जे राजकारण करु इच्छित आहेत, त्यांचीही हीच स्थिती होईल. महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
यावेळी काश्मिरी पंडिताच्या हत्येच्या मुद्यावरही संजय राऊतांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सातत्याने काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांची हत्या केली जात आहे. काल एका तरुण सरकारी कर्मचारी, काश्मिरी पंडित आपल्या कार्यालयात काम करत असताना त्यांची हत्या झाली. हे वारंवार होऊ लागले आहे. पुन्हा एकदा काश्मीरमधील स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. केंद्र सरकार आणि खासकरुन नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यामुळे यामुद्यावरुन राजकारण काही काळ दूर ठेवले पाहिजे.
भाजपचा आणि मोदी सरकारचा काश्मिरी पंडितांची घऱवापसी हा मुख्य अजेंडा होता. त्यासाठी कलम 370 हटवण्यात आले. त्यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. तरीही काश्मिरी पंडितांची घरवापसी झालेली नाही. काश्मीर आजही शांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत. फक्त काश्मिरी पंडित नाही, तर तेथील सामान्य जनतेचे जीवनही असुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. फक्त पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही, तुम्ही काय कठोर पावले उचलता हे पहावे लागेल असे राऊत म्हणाले.
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उचलून तुम्ही काश्मिरी पंडितांचे प्रश्न विचलित करु शकत नाही. याकडे देशाचे बारीक लक्ष आहे. याकडे अत्यंत संवेदनशीलपणे शिवसेना पाहत आहे. जे शक्य असेल, ते आम्ही करु. पण सरकार काय करत आहे? इतर विषय बाजूला ठेवून काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेकडे सरकारला पहावे लागेल. एका बाजूला चीन घुसले आहे आणि दुसरीकडे काश्मीर अशांत असून हे देशाला परवडणार नाही.