न्यायालयाचा आदेश : अनिल देशमुख यांना खासगी नव्हे, तर सरकारी रुग्णालयात घ्यावे लागतील उपचार


मुंबई: मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी नाकारली असून, ते फक्त शहरातील सरकारी जेजे रुग्णालयात उपचार घेऊ शकतात. देशमुख यांनी तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या आवडीच्या खासगी रुग्णालयात डिस्लोकेशन शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी हलवण्याची परवानगी मागितली होती. राष्ट्रवादीच्या नेत्याने स्वतःचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले होते.

जेजे रुग्णालयातच उपचार घेण्याचे आदेश
तथापि, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या याचिकेला विरोध केला आणि सांगितले की जेजे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी पात्र डॉक्टर आहेत. न्यायालयाने देशमुख यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्यावर जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि उपचार होऊ शकतात, असे सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत.

सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर, ईडीने दावा केला होता की देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि मुंबईतील विविध बारमधून 4.70 कोटी रुपये गोळा केले. देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेला ही रक्कम देण्यात आली होती.