प्योंगप्यांग – कोरोनाचा फैलाव उत्तर कोरियात झालेला असतानाच सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उत्तर कोरियामधील सरकारी मीडियाने दिली आहे. गुरुवारी पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची उत्तर कोरियाने जाहीर कबुली दिल्यानंतर सहा जणांच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे.
उत्तर कोरियात कोरोना; सहा जणांचा मृत्यू, तर 1 लाख 87 हजारांहून अधिक लोक क्वारंटाईन
यासंदर्भात KCNA ने दिलेल्या वृत्तानुसार, देशात एप्रिल महिन्यात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर सध्या 1 लाख 87 हजार 800 लोकांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 50 हजार लोकांमध्ये लक्षणे दिसली असून यातील 1 लाख 62 हजार 200 लोकांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. सहापैकी मृत्यू झालेल्या एकाला ओमिक्रॉनची लागण झाली होती.
उत्तर कोरियाने देशात आणीबाणी जाहीर केली असून अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. हुकूमशाह किम जोंग उन याने मंगळवारी अँटी-व्हायरस कमांड सेंटरला भेट देत आढावा घेतला. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हाच दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्यापासून देशात करोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा याआधी उत्तर कोरियाने केला होता. विशेष म्हणजे 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियात एकही व्यक्तीचे लसीकरण झालेले नाही. तसेच देशातील आरोग्यव्यवस्था कोरोनाशी दोन हात करण्याएवढी सक्षमदेखील नाही.