औरंगाबाद – खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह दर्शन घेतल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच या वेळी केलेल्या भाषणामध्ये अकबरुद्दीन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अकबरुद्दीन यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राज शिवसेनेतून बाहेर पडल्याची आठवण करुन देत टोला लगावला. राज यांचे अकबरुद्दीन यांनी थेट नावे घेतले नसले, तरी मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे ही टीका राज यांच्यासंदर्भात होती, हे स्पष्टच आहे.
अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका
अकबरुद्दीन यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका करताना, घरातून ज्यांना बाहेर काढले आहे आणि ज्यांची लायकी नाही त्यांना आपण काय उत्तर देणार, असा प्रश्न उपस्थित करीत अकबरुद्दीन यांनी भोंग्याबाबत सुरू असणाऱ्या वादाकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. एकही खासदार ज्यांचा नाही, ते भुंकत आहेत, त्यांना भुंकू द्या, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हा सगळा टीआरपीचा खेळ असल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी अप्रत्यक्षपणे राज यांना आव्हानही दिले. अकबरुद्दीन ओवेसी लढेल आपल्या आवडीच्या ठिकाणी आपल्या आवडीच्या वेळेवर लढेल. तुमच्या आवडीच्या ठिकाणावर नाही. वेळ मी ठरवणार आणि जागा देखील मी ठरवणार, असेही ते म्हणाले.
गुरुवारी केलेल्या भाषणात आक्रमक भाषणासाठी ओळखले जाणारे अकबरुद्दीन यांनी मुस्लिमांच्या शिक्षणातील घसरणीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच ज्या पद्धतीने हैदराबादमध्ये शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे, तसेच ते औरंगाबादमध्येही सुरू केले जाईल, असे सांगितले. केवळ एक आणि एकच धर्म किंवा जात देशाच्या बांधणीमध्ये पुढे जाणार असेल, तर देश पुढे जाईल असे मानणारा माणूस मूर्ख असेल. देशात हिंदु, मुस्लीम, शीख, इसाई, पारशी, जैन सारेजण पुढे गेले, तर संपूर्ण देश पुढे जाईल. औरंगाबाद येथील शाळेत सर्व धर्मीयांना प्रवेश असेल, असेही अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.