संतापजनक : पुण्यात 11 वर्षीय मुलगा 2 वर्षापासून 22 कुत्र्यांसोबत कैद, पालकांना अटक


पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तेथे पालकांनी 11 वर्षाच्या मुलाला 22 कुत्र्यांसह गेल्या दोन वर्षांपासून बंद करुन ठेवले होते. या दरम्यान, त्याचे पालक त्याला भेटायला अनेकदा येत होते. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून मुलाची कुत्र्यांपासून सुटका केली. बुधवारी रात्री उशिरा याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपी पालकांना अटक केली आहे.

पुणे पोलिसांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की, आम्ही संजय लोधिया आणि शीतल लोधिया यांना चुकीच्या पद्धतीने मुलाला घरात डांबून ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. दोघेही कोंढव्यातील कृष्णाई इमारतीत राहतात. त्यांनी घरात 22 कुत्रे पाळले होते. यातील बहुतांश कुत्रे रस्त्यावरून उचलण्यात आले होते. पाटील यांनी सांगितले की, आरोपी दाम्पत्य जेवण देण्यासाठी घरी यायचे आणि काही वेळ तिथे राहून निघून जायचे.

अशा प्रकारे झाला मुलाला घरात कैद करण्यात आल्याचा खुलासा
पाटील म्हणाले की, कृष्णाई बिल्डिंगमधील काही रहिवाशांनी घरात कैद झालेल्या मुलाला खिडकीजवळ उभे राहून विचित्र कृत्य करताना पाहिले, त्यानंतर त्यांनी चाइल्ड लाईनच्या अनुराधा सहस्रबुद्धे यांना फोन करून याबाबत माहिती दिली. हे मूल सहसा बाल्कनी किंवा खिडकीवर बसायचे. दिवसभर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. गेल्या एक आठवड्यापासून घरातून दुर्गंधी येत होती, त्यानंतर शेजाऱ्यांनी नाराज होऊन तक्रार केली.

एका बेडरूममध्ये हा मूलगा होता 22 कुत्र्यांसोबत
तक्रारीनंतर पोलीस कारवाईत दाखल झाले आणि चाइल्ड लाईनच्या मदतीने कृष्णाई बिल्डिंगच्या फ्लॅटवर छापा टाकून मुलाची सुटका केली. नंतर त्याला चाईल्ड वेअफेअरच्या माध्यमातून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर आई आणि वडिलांविरुद्ध बाल न्याय कायद्याच्या कलम 23 आणि 28 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे मुलाला 22 कुत्र्यांसोबत एका बेडरूममध्ये राहण्यास भाग पाडले गेले.

कुत्र्यांसारखा वागू लागला मुलगा
आरोपी दाम्पत्याला कुत्रे पाळण्याचा शौक असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी अनेक कुत्रे घरात आणले आणि त्यांच्यासोबत राहिल्यामुळे मुलामध्ये अशीच लक्षणे निर्माण झाली आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, मुलगा खिडकीत बसून कुत्र्यासारखे वागत असे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. शाळा सुरू झाल्यावर त्या मुलाने शाळेतील इतर मुलांनाही कुत्र्यासारखे चावले. या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी पोलिस गुरुवारी शाळेत जाऊन प्रकरणाचा तपास करणार आहेत.

अत्यंत वाईट अवस्थेत सापडला मुलगा : चाइल्ड लाईन
या प्रकरणी चाइल्ड लाईनच्या समन्वयक अपर्णा मोडक यांनी सांगितले की, जेव्हा मुलाला घरातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. संपूर्ण घर अस्वच्छ होते. कुत्रे घरातील पलंगाच्या वर आणि खालच्या बाजूला झोपले. हे सर्व भटके कुत्रे होते.