संभाजीराजेंनी राज्यसभा खासदारकीबाबत घेतला मोठा निर्णय, केली नव्या संघटनेची घोषणा!


पुणे – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे. सातत्याने राज्य सरकार, विरोधी पक्ष यांच्याशी मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्यांसाठी संभाजीराजे भोसले यांनी पाठपुरावा केला आहे. पण त्यांचे राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनी देखील समाधान न झाल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. संभाजीराजे भोसले यांनी या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केले आहेत.

पत्रकार परिषदेत संभाजीराजे भोसले यांनी त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. मी नक्कीच या वर्षीची राज्यसभेची निवडणूक लढवणार आहे. मी अपक्ष म्हणून यावर्षीची निवडणूक लढवणार आहे. मी राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचे हित पाहिले. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणे गरजेचे आहे.

29 अपक्ष आमदारांनी मोठे मन दाखवायला हवे. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. तुम्ही माझ्या कामाची दखल गेऊन मला राज्यसभेत पाठवावे अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. कोणत्याही पक्षात मी जाणार नाही. अपक्ष म्हणून ही निवडणूक मी लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नसल्याचे संभाजीराजे भोसले यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

त्यांनी आपल्या दुसऱ्या निर्णयामध्ये एका नव्या संघटनेची घोषणा केली आहे. वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक मला पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. यादरम्यान मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. एका छताखाली या जनतेला कसे आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला असल्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. स्वराज्य असे त्या संघटनेचे नाव आहे. याच महिन्यात यासाठी मी राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. ही संघटना आजपासून स्थापन झाली असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी जाहीर केले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी मला बोलवून विनंती केली की आपण राष्ट्रपतीनियुक्त खासदार व्हावे. मी खासदार झालो, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पहिल्यांदा मी मोदींना भेटलो, तेव्हा मी राजश्री शाहू महाराजांचे पुस्तक त्यांना दिले होते. त्यात मी माझा अभिप्राय लिहिला होता. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणेच माझी वाटचाल असणार आहे. त्याप्रमाणेच 6 वर्षांत राजकारणविरहीत समाजाला दिशा देण्याच्या नियमाप्रमाणे मी चाललो.

मी अनेक कामे या काळात केली. समाजहिताच्या दृष्टीने माझा कार्यकाळ होता. 2007 पासून 2022 पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतले आहे. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातील ५-६ दिवसच तेथे जातो. पण लोकसेवा करायची असेल, तर राजसत्ता देखील महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.