रुग्णालयाच्या एमआरआय वॉर्डमध्ये अज्ञात व्यक्तीने काढले खासदार नवनीत राणा यांचे फोटो, मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा


मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची येथील एका खासगी रुग्णालयात एमआरआय तपासणी सुरू असताना फोटो शेअर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उपनगरातील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने एमआरआय वॉर्डमध्ये प्रवेश केला आणि राणा यांचे फोटो क्लिक केले. एमआरआय विभागात मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की भारतीय दंड संहितेच्या कलम 448 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना या महिन्याच्या सुरुवातीला देशद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर करण्यात आला होता आणि नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खाजगी निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर ‘हनुमान चालिसा’ पाठ करण्याची घोषणा केल्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. सुटकेनंतर नवनीत राणा यांना 5 मे रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 6 मे रोजी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले.