उत्तर कोरिया: ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर किम जोंग उनने लागू केला लॉकडाऊन


प्योंगयांग – गुरुवारी उत्तर कोरियामध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आले आहे. यानंतर देशभरात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्याचवेळी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे, तो अनेक दिवसांपासून तापाने त्रस्त होता. तपासाअंती ही व्यक्ती ओमिक्रॉनबाधित असल्याचे समोर आले.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (KCNA) नुसार, पहिले प्रकरण समोर आल्यानंतर किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. त्याचवेळी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग दोन दिवसांसाठी बंद असल्याच्या बातम्या येत आहेत.

ओमिक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर कोरियाच्या सीमेवरही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना देशाच्या सीमांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्यांची कसून तपासणी करावी.