उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य, आजपासून शिक्षणापूर्वी दररोज होणार जन-गण-मन


लखनौ – आता उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये शिक्षणापूर्वी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. यूपी मदरसा एज्युकेशन बोर्ड कौन्सिलने हा आदेश जारी केला आहे. हा आदेश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांना लागू असेल. वर्ग सुरू होण्यापूर्वी सकाळच्या प्रार्थनेदरम्यान राष्ट्रगीत वाजवले जाईल. रमजान आणि ईदच्या सुट्या संपल्यानंतर गुरुवारपासून म्हणजे आजपासून सर्व मदरसे सुरू झाले आहेत. मदरशांमध्ये 14 मेपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत.

संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे निर्णय
24 मार्च रोजी झालेल्या यूपी मदरसा शिक्षण परिषदेच्या बैठकीत मदरशांमध्ये राष्ट्रगीताचा निर्णय घेण्यात आला होता. निबंधक निरीक्षक एसएन पांडे यांनी हे आदेश प्रसिद्ध केले. त्यांनी सांगितले की 2022-23 च्या सत्रासाठी शाळा उघडल्यानंतरच राष्ट्रगीत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मदरसा बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

14 ते 23 मे या कालावधीत होणार आहेत मदरसा बोर्डाच्या परीक्षा
यूपी मदरसा बोर्डाच्या परीक्षा 14 ते 23 मे या कालावधीत होणार आहेत. लखनौचे जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी जगमोहन यांच्या वतीने परीक्षेचा कार्यक्रम सर्व मदरशांना पाठवण्यात आला आहे. यामध्ये परीक्षेच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

14 मे पासून अरबी, पर्शियन 2022 च्या परीक्षा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी दिली. पहिली शिफ्ट सकाळी 8 ते 11 आणि वरिष्ठ माध्यमिक परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. येथे शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वेळापत्रकाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

एक लाख ६२ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार आहेत परीक्षा
यावेळी वार्षिक परीक्षेसाठी एकूण एक लाख 62 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. वर्गनिहाय विचार केला, तर माध्यमिक वर्गाच्या परीक्षेसाठी सर्वाधिक 91 हजार 467 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर वरिष्ठ माध्यमिकसाठी 25 हजार 921, कामिल प्रथम वर्षासाठी 13 हजार 161 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

कामिल द्वितीय वर्षासाठी 10 हजार 888, कामिल तृतीय वर्षासाठी 9 हजार 796, फाजील प्रथम वर्षासाठी 5 हजार 197 आणि फाजील द्वितीय वर्षासाठी 6 हजार 201 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.