कॅम्पबेल विल्सन एअर इंडियाचे नवीन सीईओ, टाटा सन्सने नियुक्तीवर केले शिक्कामोर्तब


नवी दिल्ली – 69 वर्षांनंतर टाटा सन्सच्या पुन्हा ताब्यात आलेल्या एअर इंडियाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आता एअरलाइन कंपनीचे नेतृत्व कॅम्पबेल विल्सन यांच्याकडे देण्यात आले आहे. टाटा सन्सने गुरुवारी या संदर्भात एक निवेदन जारी करून सांगितले की, विल्सन यांची एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुर्कीचे इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रथम निवड झाली होती, परंतु अनेक वादांमुळे त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी जबाबदारी स्वीकारली. पण एअर इंडियाची धुरा सोपवण्यासाठी सीईओचा शोध जोरात सुरू होता. आता टाटा सन्सने 50 वर्षीय कॅम्पबेल विल्सन यांची या पदावर नियुक्ती केली आहे.

एअर इंडियाच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यावर कॅम्पबेल विल्सन म्हणाले, प्रतिष्ठित एअर इंडियाचे नेतृत्व करणे आणि टाटा समूहाचा भाग होणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. एअर इंडिया जगातील सर्वोत्तम एअरलाइन्सपैकी एक होण्याच्या रोमांचक प्रवासाच्या उंबरठ्यावर आहे.

अहवालानुसार, विल्सन यांना विमान वाहतूक उद्योगात 26 वर्षांचा अनुभव आहे. जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी आपली सेवा दिली आहे. दीर्घ शोधानंतर, टाटा सन्सने 12 मे रोजी घोषणा केली की, कमी किमतीच्या एअरलाइन स्कूटचे संस्थापक सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाचे एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विल्सन यांनी 2011 मध्ये Scoot चे CEO म्हणून पदभार स्वीकारला होता.